नागपुरात नवा वाद; हे विधान ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करणारे असल्याचे तज्ज्ञांचे मत.

नागपूर: आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे पीठासीन धीरेंद्र कृष्ण शास्त्री तथा बागेश्वर बाबा यांनी आता थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे. नागपूर येथे आयोजित 'भारतदुर्गा शक्तीपीठ' शिलान्यास सोहळ्यात बोलताना त्यांनी शिवरायांच्या इतिहासाचा चुकीचा संदर्भ दिल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे युद्ध करून थकले होते आणि त्यांनी आपले राज्य समर्थ रामदास स्वामींच्या झोळीत अर्पण करून विश्रांतीची मागणी केली होती, असा अजब दावा धीरेंद्र शास्त्री यांनी या व्यासपीठावरून केला.
नागपूरच्या जामठा परिसरात जगातील पहिले भारतदुर्गा मंदिर उभारले जात असून, या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज साधू-संत उपस्थित होते. या सोहळ्यात बोलताना बागेश्वर बाबांनी सनातनी परंपरेचा गौरव केला, मात्र त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचा एक असा प्रसंग सांगितला ज्याचा कोणताही ऐतिहासिक आधार नाही. शिवाजी महाराज युद्ध करता करता खूप थकले होते. त्यांना वाटले की आता आपल्याकडून पुढे लढाया होणार नाहीत. त्यामुळे ते समर्थांकडे गेले, आपला मुकुट त्यांच्या चरणी ठेवला आणि मला आता काही दिवस आराम हवा आहे असे म्हणत राजपाट सांभाळण्याची विनंती केली." असे विधान शास्त्री यांनी केले.
धीरेंद्र शास्त्री एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पुढे असेही सांगितले की, समर्थांनी शिवरायांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आणि मुकुट पुन्हा त्यांच्या डोक्यावर ठेवून राज्य चालवण्याची आज्ञा दिली. शिवरायांसारख्या जाज्वल्य आणि कधीही न थकणाऱ्या महापुरुषाबद्दल 'थकले होते' किंवा 'आराम हवा होता' अशी भाषा वापरल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताबद्दल अशा प्रकारचे विधान करणे हे ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करणारे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
याच कार्यक्रमात पुढे भाषण करताना बागेश्वर बाबांनी हिंदूंना 'चार मुले' जन्माला घालण्याचा सल्ला देऊन आणखी एका वादाला तोंड फोडले आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबाने चार मुलांना जन्म द्यावा आणि त्यातील एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी समर्पित करावे, असे आवाहन त्यांनी केले. लोकसंख्या नियंत्रण आणि धार्मिक सलोख्याच्या मुद्द्यावरून देशात आधीच चर्चा सुरू असताना, एका भव्य सार्वजनिक व्यासपीठावरून असे विधान करणे राजकीय आणि सामाजिक स्तरावर वादग्रस्त ठरू शकते. यापूर्वीही अनेकदा त्यांनी वादग्रस्त विधाने केली असून, आता थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर भाष्य केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.