ट्रान्झिट रिमांडवर आज रात्री गोव्यात आणणार

म्हापसा : वास्को (Vasco) येथील सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी गौतम खट्टर (Gautam Khattar) याला अखेर गोवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हिमाचल प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, गोवा गुन्हे शाखेच्या (Crime Branch, Goa) पथकाने त्याला रीतसर अटक केली असून; ट्रान्झिट रिमांडवर शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्याला गोव्यात आणले जाणार आहे.
संशयित गौतम खट्टर परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने; पोलिसांनी (Police) त्याच्याविरुद्ध 'लूक आऊट नोटीस' जारी केली होती. पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विकास दयेकर आणि त्यांच्या पथकाने उत्तराखंड ते हिमाचल प्रदेश असा सलग पाठलाग केला. मोबाईल बंद करूनही तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी त्याचा शोध लावला.
वास्को पोलिसांनी सुरूवातीला या प्रकरणाचा तपास केला होता, मात्र प्रकरणाचे गांभीर्य पाहून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक माधव नाईक, हवालदार नवीन पालयेकर व इतर सहकारी पोलीस खट्टर याला अटक करून गोव्याकडे रवाना झाले आहेत. आता खट्टरला गोव्यात आणल्यानंतर त्याची सविस्तर चौकशी केली जाईल आणि या प्रक्षोभक भाषणामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला जाईल.
कुल्लूच्या टेकड्यांमधून गौतमला घेतले ताब्यात
गौतम खट्टर गोव्यातून पसार झाल्यापासून पोलीस त्याचा मागावर होते. तो हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील मराल येथील एका दुर्गम टेकडीवरील श्री नीळकंठ मंदिरातील मठात लपला होता. पोलिसांच्या चाहूल लागताच त्याने तिथून पळ काढला, मात्र हिमाचल प्रदेश पोलिसांनी मराल येथील चेक नाक्यावर सापळा रचून त्याला कारसह ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली.