कीटकनाशकांच्या अंशामुळे फळे-भाज्या खाल्ल्याने कर्करोगाचा धोका : नव्या संशोधनातील निष्कर्ष

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
34 mins ago
कीटकनाशकांच्या अंशामुळे फळे-भाज्या खाल्ल्याने कर्करोगाचा धोका :  नव्या संशोधनातील निष्कर्ष

कॅल‌िफोर्न‌िया : अमेरिकेतील सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठातील (University of Southern California (USC)) संशोधकांनी केलेल्या नव्या अभ्यासातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचे अधिक प्रमाणात सेवन करणाऱ्या तरुण, धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता दर्शविण्यात आली आहे. मात्र, यामागे अन्नपदार्थ नव्हे तर त्यावर उरलेले कीटकनाशकांचे अंश (पेस्टिसाइड्स) कारणीभूत असू शकतात, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

हा अभ्यास अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रिसर्चच्या (American Association for Cancer Research) २०२६ वार्ष‌िक परिषदेत सादर करण्यात आला.  या संशोधनात ५० वर्षांखालील फुफ्फुसाच्या कर्करोगाने बाधित १८७  रुग्णांच्या आहार, धूम्रपान सवयी आणि इतर सामाजिक घटकांचा अभ्यास करण्यात आला.

‘हेल्दी ईटिंग इंडेक्स’नुसार (१०० पैकी गुणांकन), सहभागींचा सरासरी स्कोअर ६५ होता, जो अमेरिकेतील सरासरी ५७ पेक्षा जास्त आहे. म्हणजेच, हे रुग्ण तुलनेने अधिक आरोग्यदायी आहार घेत होते. विशेषतः हिरव्या भाज्या, कडधान्ये आणि संपूर्ण धान्यांचे सेवन अधिक प्रमाणात आढळले. महिलांमध्ये हा स्कोअर आणखी जास्त होता.

अभ्यासाचे प्रमुख संशोधक जॉर्ज नियेवा यांनी सांगितले की, कीटकनाशके, रासायनिक खते वापरून (नॉन-ऑर्गेनिक) पिकवलेल्या फळे-भाज्यांमध्ये कीटकनाशकांचे अंश जास्त असू शकतात. यामुळे कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, कीटकनाशकांच्या संपर्कात येणाऱ्या शेतमजुरांमध्येही फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.

संशोधनानुसार, धूम्रपान न करणाऱ्या ५० वर्षांखालील व्यक्तींमध्ये, विशेषतः महिलांमध्ये, कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या रुग्णांचा आहार इतरांपेक्षा अधिक आरोग्यदायी होता, ही बाब संशोधकांसाठी चिंतेची ठरत आहे.

तथापि, या अभ्यासात सहभागी झालेले स्वतःहून निवडले गेले असल्यामुळे निष्कर्षांमध्ये काही प्रमाणात पक्षपात असण्याची शक्यता असल्याचेही संशोधकांनी मान्य केले आहे. यापूर्वीच्या संशोधनांमध्ये वायूप्रदूषण आणि हार्मोनमध्ये बदल घडवणारे घटक (हॉर्मोन-डिसरप्टर्स) हे देखील कर्करोगाच्या वाढीशी संबंधित असल्याचे आढळले आहे.

या पार्श्वभूमीवर, धूम्रपान कमी असतानाही कर्करोगाचे प्रमाण का वाढते आहे, याचा सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे.

हेही वाचा