ड्रग्जचा रासायनिक अहवाल, कारवाईतील त्रुटींमुळे प्रसाद वाळकेची निर्दोष सुटका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd April, 11:59 pm
ड्रग्जचा रासायनिक अहवाल, कारवाईतील त्रुटींमुळे प्रसाद वाळकेची निर्दोष सुटका

पणजी : रासायनिक अहवालात ड्रग्जबाबत स्पष्टता आली नाही. तसेच कारवाईत मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत, असे निरीक्षण नोंदवून मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयित प्रसाद वाळके याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश न्या. आरतीकुमारी नाईक यांनी दिला.

या प्रकरणी गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) ८ आॅगस्ट २०२३ रोजी गुन्हा दाखल केला होता. दि. ७ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसाद वाळके याच्याकडून ४ लाख २० हजार रुपये किमतीचा ३० ग्रॅम उच्च दर्जाचे गांजा, १५ ग्रॅम एमडीएमए आणि १५ ग्रॅम एॅक्टसी पावडर जप्त केला. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करून कारवाई केली.

या प्रकरणी पोलिसांनी तपासपूर्ण करून ३ फेब्रुवारी २०२४ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन २३ डिसेंबर २०२४ रोजी प्रसाद वाळके याच्याविरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला. सुनावणी झाली असता, संशयितातर्फे अॅड. कमलाकांत पोवळेकर यांनी बाजू मांडली. त्यात त्यांनी संशयिताची झडती पोलीस कॉन्स्टेबलने केली आहे. त्याला अटक करताना आवश्यक नियम पाळले गेले नाही. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत ड्रग्जची चाचणी नियमानुसार झाली नाही. या प्रकरणी अनेक त्रुटी असल्याचा मुद्दा उपस्थित करून संशयिताची निर्दोष सुटका करण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून प्रसाद वाळके याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. 

हेही वाचा