मुंबईचा चेन्नईकडून १०३ धावांनी धुव्वा : संजूचे शतक, हुसेनचे ४ बळी

मुंबई: आयपीएल २०२६ च्या ३३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने यजमान मुंबई इंडियन्सचा त्यांच्याच होम ग्राउंडवर १०३ धावांनी धुव्वा उडवला. संजू सॅमसनचे नाबाद शतक आणि अकिल हुसेनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने या हंगामातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एकाची नोंद केली. २०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा डाव अवघ्या १०४ धावांत गडगडला.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाड २२ धावांवर बाद झाला. मात्र, संजू सॅमसनने वानखेडेचे मैदान गाजवत मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. संजूने अवघ्या ५४ चेंडूत नाबाद १०१ धावा फटकावल्या, ज्यात १० चौकार आणि ६ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. इतर फलंदाजांमध्ये देवाल्ड ब्रेविस (२१) आणि कार्तिक शर्मा (१८) यांनी उपयुक्त योगदान दिले. चेन्नईने २० षटकांत ६ बाद २०७ धावांचा डोंगर उभा केला.
मुंबईकडून जसप्रीत बुमराहने ४ षटकांत ३१ धावा देत १ बळी घेतला, तर युवा गोलंदाज ए.एम. गझनफर आणि अश्वनी कुमार यांनी प्रत्येकी २ बळी टिपले.
२०८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामीवीर क्विंटन डी कॉक (७) आणि दानिश मालेवार (०) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर मधल्या फळीत सूर्यकुमार यादव (३६) आणि तिलक वर्मा (३७) यांनी ७३ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अकिल हुसेनने ही जोडी फोडताच मुंबईचा डाव पत्त्यासारखा कोसळला.
एका क्षणी ३ बाद ८४ धावांवर असलेल्या मुंबईचे शेवटचे ७ बळी अवघ्या २० धावांत गेले. कर्णधार हार्दिक पांड्या (१), शेर्फेन रदरफोर्ड (०) आणि नमन धीर (०) पूर्णपणे अपयशी ठरले. मुंबईचा संपूर्ण संघ १९ व्या षटकात १०४ धावांत तंबूत परतला.
अकिल हुसेनचा फिरकीचा वेढा
चेन्नईच्या विजयात गोलंदाज अकिल हुसेन सर्वात मोठा वाटा ठरला. त्याने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १७ धावा देत ४ महत्त्वाचे बळी घेतले. त्याला नूर अहमद (२ बळी) आणि मुकेश चौधरी (१ बळी) यांनी मोलाची साथ दिली.
या सामन्यात संजू सॅमसनने आपल्या डावात ६ षटकार खेचले. या डावातील सुरुवातीचे ३ षटकार मारताच त्याने एमएस धोनीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. आयपीएल कारकिर्दीत एकाच डावात ३ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारण्याचा पराक्रम संजूने आतापर्यंत ३४ वेळा केला आहे. इतक्याच वेळा हा कारनामा एमएस धोनीने देखील केला आहे. या विक्रमासह संजू आता संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
वानखेडे स्टेडियम संजू सॅमसनसाठी नेहमीच लकी राहिले आहे. यापूर्वी एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही त्याने याच मैदानावर इंग्लंडविरुद्ध तुफान फटकेबाजी केली होती. आजही त्याच जोशात फलंदाजी करत त्याने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. चेन्नईच्या डावाची सुरुवात अडखळत झाली, मात्र संजू सॅमसनने एक बाजू खंबीरपणे लावून धरली. त्याने केवळ ५४ चेंडूत १०१ धावांची नाबाद खेळी साकारली. या खेळीत त्याने १० चौकार आणि ६ उत्तुंग षटकार मारले. त्याच्या या शतकी खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सने २० षटकांत ६ बाद २०७ धावांचा डोंगर उभा केला.कर्णधार ऋतुराज गायकवाडने २२ (१४ चेंडू) धावांचे योगदान दिले. मुंबईकडून ए.एम. गझनफरने २, अश्वनी कुमारने २ बळी, तर जसप्रीत बुमराह आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी १ बळी घेतला.
टी-२० फॉरमॅटमध्ये (आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत टी-२० धरून) सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये आता मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. विशेषतः अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे या यादीत मोठे बदल झाले आहेत. या यादीत विराट कोहली आणि तरुण फलंदाज अभिषेक शर्मा ९ शतकांसह संयुक्तपणे अव्वल स्थानी आहेत. अभिषेक शर्माने अत्यंत कमी काळात ही झेप घेतली आहे.भारताचा कर्णधार रोहित शर्मा ८ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. संजू सॅमसनने अलीकडच्या काही सामन्यांतील जबरदस्त कामगिरीच्या जोरावर ८ वे शतक पूर्ण करत रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
आयपीएलच्या इतिहासात शतकांचा पाऊस पाडणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली अजूनही राजा (किंग) आहे. मात्र, जोस बटलर आणि संजू सॅमसन वेगाने त्याचे रेकॉर्ड्स मोडण्याच्या जवळ पोहोचत आहेत. आयपीएलमध्ये ८ शतकांसह विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने एकाच मोसमात ४ शतके करण्याचा विक्रमही केला होता. जोस बटलर ७ शतकांसह विराटच्या अगदी जवळ पोहोचला आहे. ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलच्या नावावर ६ शतके आहेत, ज्यामध्ये १७५ धावांच्या अजरामर खेळीचा समावेश आहे. संजू सॅमसनने आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध केलेल्या ताज्या शतकामुळे त्याच्या आयपीएलमधील शतकांची संख्या ५ झाली आहे. यासह त्याने लोकेश राहुलच्या (५ शतके) विक्रमाची बरोबरी केली आहे.
संक्षिप्त धावफलक:
चेन्नई सुपर किंग्स: २०७/६ (२० षटके) - संजू सॅमसन १०१*, ऋतुराज गायकवाड २२. (बुमराह ३१/१, अश्वनी कुमार ३७/२).
मुंबई इंडियन्स: १०४/१० (१९ षटके) - टिळक वर्मा ३७, सूर्यकुमार यादव ३६. (अकिल हुसेन १७/४, नूर अहमद २४/२).
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकवणारे फलंदाज
विराट कोहली ८
जोस बटलर ७
ख्रिस गेल ६
लोकेश राहुल ५
संजू सॅमसन ५
टी-२० मध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज
विराट कोहली ९
अभिषेक शर्मा ९
रोहित शर्मा ८
संजू सॅमसन ८
एकाच डावात ३ हून अधिक षटकार मारणारे फलंदाज:
रोहित शर्मा: ४९ वेळा
विराट कोहली: ४२ वेळा
संजू सॅमसन: ३४ वेळा
एमएस धोनी: ३४ वेळा
केएल राहुल: ३२ वेळा
आयपीएलमध्ये मुंबईविरुद्ध चेन्नईची सर्वोच्च धावसंख्या
२१८/४ दिल्ली, २०२१
२०८/५ चेन्नई, २००८
२०७/६ वानखेडे, मुंबई २०२६
२०६/४ वानखेडे, मुंबई, २०२४
चेन्नईसाठी एकापेक्षा जास्त शतके झळकावणारे फलंदाज
शेन वॉटसन २
मुरली विजय २
ऋतुराज गायकवाड २
संजू सॅमसन २