गिल-बटलरची फटकेबाजी : प्रसिद्ध कृष्णाचा भेदक मारा

लखनौ: आयपीएल २०२६ च्या रोमांचक लढतीत गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा त्यांच्याच घरच्या मैदानावर ७ विकेट्स राखून सहज पराभव केला. शुबमन गिल आणि जोस बटलर यांची अर्धशतकी खेळी आणि प्रसिद्ध कृष्णाची घातक गोलंदाजी याच्या जोरावर गुजरातने या विजयाची नोंद केली.
गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि लखनौ संघाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १६४ धावा केल्या. तर गुजरातने जोस बटलर आणि शुबमन गिलच्या खेळीच्या बळावर १८.४ षटकांत सहज विजय मिळवला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना साई सुदर्शन १५ धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर शुबमन गिल आणि जोस बटलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. जोस बटलरने ६० तर शुबमन गिलने ५६ धावांची खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरने १३ चेंडूत २१ धावांची खेळी करत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
गुजरातने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत लखनौच्या धडाकेबाज फलंदाजांना रोखले. लखनौच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. एडन मारक्रम आणि मिचेल मार्श या अनुभवी जोडीकडून लखनौला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र ते अपेक्षित सुरुवात देऊ शकले नाहीत. कर्णधार ऋषभ पंत १८ धावा करून तंबूत परतला. आयुष बदोनी स्थिरावतोय वाटत असतानाच बाद झाला. मागच्या सामन्याचा नायक मुकुल चौधरी १८ धावा करून तंबूत परतला. निकोलस पूरनही झटपट तंबूत परतला. अब्दुल समदही अपयशी ठरला. गुजरातच्या गोलंदाजांनी उसळत्या चेंडूचा मारा करत लखनौच्या फलंदाजांना निष्प्रभ केले. प्रसिद्ध कृष्णाने ४ विकेट्स घेत लखनौच्या डावाला खिंडार पाडले.शुबमन गिलने आपल्या ४ हजार आयपीएल धावा पूर्ण केल्या. डावांच्या आधारावर स्पर्धेत सर्वात जलद ४ हजार धावा करणारा खेळाडू म्हणून विराट कोहलीला मागे टाकले आहे. आयपीएलमध्ये डावांच्या आधारावर सर्वात जलद ४ हजार धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज हा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे. केएलने १०५ डावांमध्ये ही कामगिरी केली. त्याच्यानंतर, शुबमन गिलने ११८ डावांमध्ये ४ हजार धावा पूर्ण करून दुसरे स्थान पटकावले आहे. यानंतर विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे.
गिलने सर्वात जलद ४ हजार धावा करण्याच्या बाबतीत विराटला मागे टाकलं आहे. विराटने १२८ डावांमध्ये ४ हजार आयपीएल धावा पूर्ण केल्या. तर सुरेश रैना आणि गौतम गंभीर यांनी १४० डावांमध्ये ही कामगिरी केली होती.बॉक्स
गिलने मोडला कोहलीचा विक्रम
या सामन्यात शुबमन गिलने ४० चेंडूंमध्ये ६ चौकार आणि एका षटकारासह ५६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ हजार धावा पूर्ण केल्या. २६ वर्षे आणि २१६ दिवस वय अलताना हा पराक्रम करून शुबमन गिल आयपीएलच्या इतिहासात ४००० धावा करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता, ज्याने २७ वर्षे आणि १९५ दिवस वय असताना हा टप्पा गाठला होता.
सर्वात जलद ४ हजार धावा करणारा भारतीय खेळाडू
केएल राहुल – १०५ डाव
शुबमन गिल – ११८ डाव
विराट कोहली – १२८ डाव
सुरेश रैना – १४० डाव
गौतम गंभीर – १४० डाव
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंटस् : २० षटकांत ८ बाद १६४ (मार्कराम ३०; प्रसिद्ध कृष्णा ४/२८, अशोक शर्मा २/३२).
गुजरात टायटन्स: १८.५ षटकांत ३ बाद १६५ (बटलर ६०, गिल ५६; प्रिन्स यादव १/३१).
लखनौ सुपर जायंट्ससाठी सर्वाधिक धावा
के. एल. राहुल १४१०
आयुष बदोनी १०३८
मार्कस स्टॉइनिस ९५२
क्विंटन डी कॉक ९०१
निकोलस पूरन १४२२
बटलरच्या १४००० धावा
जोस बटलरने १४,००० धावांचा टप्पा ४६८ डावांमध्ये पूर्ण केला आहे. सर्वात कमी डावांमध्ये हा विक्रम करण्याच्या यादीत तो आता तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. याबाबतीत त्याने अॅलेक्स हेल्स आणि किरॉन पोलार्ड यांना मागे टाकले आहे. या यादीत ख्रिस गेल (४२३ डाव) पहिल्या, तर डेव्हिड वॉर्नर (४३१ डाव) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावांची यादी
ख्रिस गेल: १४,५६२ धावा
किरॉन पोलार्ड: १४,४८२ धावा
अॅलेक्स हेल्स: १४,४४९ धावा
डेव्हिड वॉर्नर: १४,१२१ धावा
जोस बटलर: १४,०२१ धावा