विराट-पडिक्कलची वादळी खेळी

आरसीबीचा हैदराबादवर ६ गडी राखून शानदार विजय

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
35 mins ago
विराट-पडिक्कलची वादळी खेळी

बंगळुरू: एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने विजयाने श्रीगणेशा केला आहे. सनरायझर्स हैदराबादने दिलेले २०२ धावांचे मोठे आव्हान आरसीबीने केवळ १५.४ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत दणदणीत विजय मिळवला.
विजयाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली होती, फिल सॉल्ट अवघ्या ७ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला
विराट कोहलीने नाबाद ६९ धावा (३८ चेंडू, ५ चौकार, ५ षटकार) केल्या. या खेळीदरम्यान विराटने टी-२० मध्ये आशियात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला.
देवदत्त पडिक्कलने ६१ धावांचे (२६ चेंडू, ७ चौकार, ४ षटकार) योगदान दिले. कर्णधार पाटीदारने केवळ १२ चेंडूत ३१ धावांची (२ चौकार, ३ षटकार) वेगवान खेळी करत विजयाचे अंतर कमी केले.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने ९ बाद २०१ धावा केल्या होत्या. इशान किशनने कर्णधाराला साजेशी खेळी करत ८० धावा (३८ चेंडू, ८ चौकार, ५ षटकार) केल्या. अनिकेत वर्माने अखेरच्या षटकांत १८ चेंडूत ४३ धावांची फटकेबाजी केली.
आरसीबीकडून पदार्पण करणाऱ्या जेकब डफीने ४ षटकांत २२ धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेतले आणि हैदराबादला सुरुवातीलाच धक्के दिले. रोमारियो शेफर्डने देखील ५४ धावांत ३ बळी टिपले. टी-२० क्रिकेटमध्ये आशियात सर्वाधिक धावांचा विक्रम पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर होता. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ५५७ सामन्यांमध्ये १३ हजार ५७१ धावा केल्या आहेत. तर आता विराटने त्याच्यापेक्षा धावा करत आशियातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. विराट कोहलीच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये १०६ अर्धशतकं आणि ९ शतकं करण्याचा विक्रम आहे. विराटने आरसीबी वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्यात ३३ चेंडूत २ चौकार व ४ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले.
अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस ही जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी मिळून संघाचा डाव सांभाळला. यादरम्यान इशान किशनने ३००० धावांचा पल्ला गाठला. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान ३००० धावा करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. इशान किशनने २१८० चेंडूत ३००० धावांचा पल्ला गाठला. आयपीएलमध्ये सर्वात जलद ३००० धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड हा रिषभ पंतच्या नावावर आहे. रिषभ पंतने २०२८ चेंडूत ३००० धावा पूर्ण केल्या.
आयपीएलमध्ये कमी चेंडूत ३००० धावा करणारे फलंदाज
२०२८ चेंडू – ऋषभ पंत
२०८२ चेंडू – युसूफ पठाण
२१३० चेंडू – सूर्यकुमार यादव
२१३५ चेंडू – सुरेश रैना
२१५२ चेंडू – एम.एस. धोनी
२१८० चेंडू – इशान किशन
२२०३ चेंडू – के.एल. राहुल
विराट कोहलीचा टी-२० विक्रम
विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानच्या शोएब मलिकला मागे टाकत त्याने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. आरसीबीच्या सामन्यापूर्वी विराटने या फॉरमॅटमध्ये ४१४ सामन्यांमध्ये आता १३५४३ धावा केल्या होत्या. तर शोएब मलिकाच्या नावे १३५७१ धावांची नोंद होती. आता विराटने २९ धावा करताच शोएब मलिकला मागे टाकले आहे.