इडन गार्डन्सवर हैदराबादचा ‘सूर्योदय’

केकेआरचा ६५ धावांनी दारुण पराभव : अभिषेक-क्लासेनची फटकेबाजी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
15 mins ago
इडन गार्डन्सवर हैदराबादचा ‘सूर्योदय’

कोलकाता: सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२६ च्या हंगामात आपला पहिला विजय नोंदवला आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या अटीतटीच्या लढतीत हैदराबादने घरच्या मैदानात खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) ६५ धावांनी धुव्वा उडवला. २२७ धावांच्या अवाढव्य लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा डाव १६१ धावांवरच आटोपला.
२२७ धावांचे लक्ष्य समोर असताना केकेआरची सुरुवात अत्यंत आक्रमक झाली. सलामीवीर फिन एलनने पहिल्याच षटकात २५ धावा कुटत हैदराबादच्या गोटात घबराट निर्माण केली होती. मात्र, हर्ष दुबेने दुसऱ्याच षटकात एलनला (७ चेंडूत २८ धावा) झेलबाद करून केकेआरला मोठा धक्का दिला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे अवघ्या ८ धावा करून माघारी परतला.
केकेआरच्या डावाला सावरण्याचे काम पुन्हा एकदा युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशीने केले. त्याने २९ चेंडूत ५२ धावा (६ चौकार, २ षटकार) फटकावत सलग दुसरे अर्धशतक झळकावले. उपकर्णधार रिंकू सिंहनेही ३५ धावांची झुंजार खेळी केली, पण दुसऱ्या बाजूने त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. धावांचे अंतर वाढत गेल्याने केकेआरचे फलंदाज दडपणाखाली आले आणि एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेले.
हैदराबादच्या क्षेत्ररक्षणात काही चुका झाल्या तरी गोलंदाजांनी मात्र चोख कामगिरी बजावली. जयदेव उनाडकटने सर्वाधिक ३ बळी घेत केकेआरच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. इशान मलिंगा आणि नितीश रेड्डी या दोघांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. हर्ष दुबेने फिन एलनची महत्त्वाची विकेट घेत सामन्याला कलाटणी दिली.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा केकेआरचा निर्णय हैदराबादच्या फलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला.सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात तुफानी पद्धतीने केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या ५.४ षटकांत ८२ धावांची आक्रमक भागीदारी केली. हेडने २१ चेंडूत ४६ धावा (६ चौकार, ३ षटकार) कुटल्या, तर अभिषेक शर्माने २१ चेंडूत ४८ धावा (४ चौकार, ४ षटकार) करत संघाला मोठी धावसंख्या गाठून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
कर्णधार इशान किशन (१४) स्वस्तात बाद झाल्यानंतर, अनुभवी हेनरिक क्लासेन याने डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने ३५ चेंडूत ५२ धावांची संयमी आणि आक्रमक खेळी केली. त्याला नितीश कुमार रेड्डी याने चांगली साथ दिली, ज्याने २४ चेंडूत ३९ धावा केल्या. या दोघांच्या ८२ धावांच्या भागीदारीमुळे हैदराबादने १८ व्या षटकात २०० धावांचा टप्पा ओलांडला.
केकेआरच्या गोलंदाजांना सुरुवातीला भरपूर मार खावा लागला, पण ब्लेसिंग मुझाराबानीने टिच्चून गोलंदाजी करत ४ बळी मिळवले. त्याने महत्त्वाच्या क्षणी इशान किशन, अभिषेक शर्मा, क्लासेन आणि शिवांग कुमार यांना बाद करून धावसंख्येवर काहीसा अंकुश ठेवला. वैभव अरोरानेही शेवटच्या षटकांत २ बळी घेतले.
बॉक्स
आयपीएल केकेआरसाठी सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आता रिंकू सिंहच्या नावावर आहे. गुरुवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने सुरुवातीला इशान किशनचा झेल घेतला आणि नंतर अनिकेत वर्माला झेलबाद करण्यात मदत केली. त्याने कोलकातासाठी ४१ झेल घेत आंद्रे रसेलचा ४० झेलचा विक्रम मोडला आहे. आयपीएलमध्ये केकेआरसाठी सर्वाधिक ४१ झेल घेण्याचा विक्रम आता रिंकू सिंहच्या नावावर आहे. आंद्रे रसेल ४० झेलसह दुसऱ्या स्थानावर आहे. सुनील नरेननेही कोलकाता नाईट रायडर्ससाठी ३६ झेल घेतले आहेत, तर मनोज तिवारीने तीन वेळच्या आयपीएल विजेत्या संघासाठी ३० झेल घेतले आहेत.
डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना एकूण १४३ षटकार खेचले आहेत. आता सनरायझर्स हैदराबाद संघासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. अभिषेक शर्माने सनरायझर्स हैदराबादसाठी १०० हून अधिक षटकार खेचले आहेत. यासह सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे.
सनरायझर्ससाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
डेव्हिड वॉर्नर- १४३ षटकार
अभिषेक शर्मा- १०१ षटकार
हेनरिक क्लासेन- ९० षटकार
केन विलियम्सन- ६४ षटकार
ट्रॅव्हिस हेड- ५० षटकार

केकेआरसाठी सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू
४१ झेल – रिंकू सिंग
४० झेल – आंद्रे रसेल
३६ झेल – सुनील नरेन
३० झेल – मनोज तिवारी

आयपीएलच्या डावातील पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा

२६ धावा: यशस्वी जयस्वाल (आरआर) विरुद्ध केकेआर, २०२३
२४ धावा: पृथ्वी शॉ (दिल्ली) विरुद्ध केकेआर, २०२१
२४ धावा: फिन एलन (केकेआर) विरुद्ध हैदराबाद, २०२६*
२२ धावा: यशस्वी जयस्वाल (आरआर) विरुद्ध पंजाब, २०२५
२१ धावा: नमन ओझा (आरआर) विरुद्ध केकेआर, २००९
२१ धावा: सुनील नरेन (केकेआर) विरुद्ध आरअार, २०१८

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध निचांकी फलंदाजी सरासरी
सुनील नरेन           १०.९
हार्दिक पांड्या          १६.८
अक्षर पटेल          २०.९
दिनेश कार्तिक          २२.३
ग्लेन मॅक्सवेल          २२.८