दुहेरीकरणाचा मार्ग होणार मोकळा : तांत्रिक अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा

मडगाव : कोकण रेल्वे मार्गावरील राज्यातील पेडणे व ओल्ड गोवा येथील रेल्वेच्या बोगद्यांना समांतर असे आणखी दोन बोगदे बांधले जाणार आहेत. या कामांचा आराखडा तयार करण्यासाठी कन्सल्टंसी नेमण्यात आली असून रेल्वे प्रशासनाकडून भू संपादनासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.
कोकण रेल्वे मागील २८ वर्षांपासून चांगल्याप्रकारची सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासासाठीच्या अडचणी येत होत्या त्यावर मात करण्यात आली आहे. गेल्या तीन दशकांपासून सातत्याने होणारी झीज आणि कमकुवत झालेली रचना लक्षात घेता, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने राज्यातील दोन महत्त्वाच्या बोगद्यांच्या जागी नवीन बोगदे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील ओल्ड गोवा येथील ५४४ मीटर लांबीचा बोगदा व पेडणे येथील १,५६१ मीटर लांबीचा बोगदा या दोन्ही बोगद्यांच्या समांतर असे दोन नवीन बोगदे बांधले जाणार आहेत. या कामाबाबतची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून देण्यात आली होती. त्यानंतर तत्काळ आराखडा निर्मितीसाठी कन्सल्टंसीची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही बोगद्यांच्या निर्मितीसाठीचा खर्च सुमारे १५०० कोटींपेक्षा जास्त येणार आहे. तर केवळ आराखडा आणि देखरेखीसाठी १७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नव्या बोगद्यांच्या कामांच्या निर्मितीसाठी ३८ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. नवीन बोगदे तयार झाल्यानंतर जुन्या बोगद्यांची दुरुस्ती केली जाईल. यामुळे या मार्गावर रेल्वे रुळांच्या दुहेरीकरणाचा मार्गही मोकळा होणार आहे.
कोकण रेल्वेचे जनसंपर्क उपव्यवस्थापक बबन घाटगे यांनी सांगितले की, पेडणे व ओल्ड गोवा येथील बोगदे इतक्या वर्षांमध्ये जीर्ण व कमकुवत झाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या बोगद्यांतील भिंतीतून पाणी झिरपत असून वारंवार दुरुस्तीची कामे हाती घ्यावी लागतात. यापूर्वी ऑगस्ट २०२० मध्ये पेडणे येथील बोगद्याची भिंत खचल्यामुळे तब्बल ४० दिवस या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जुलै २०२४ मध्येही मुसळधार पावसामुळे बोगद्यात पाणी आणि चिखल साचल्याने कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा पुनर्रचना प्रस्ताव मांडला आहे. या प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन सुरू झाले असून, रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी मिळताच कामाला वेग येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जुन्या बोगद्यांचीही होणार दुरुस्ती
पेडणे व ओल्ड गोवा येथील कोकण रेल्वे मार्गावरील नव्या बोगद्यांच्या उभारणीचे काम पूर्णत्वास आल्यानंतर जुन्या बोगद्यांची पूर्णपणे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्तीनंतर दोन्ही समांतर बोगदे वाहतुकीसाठी वापरले जाणार आहेत. यामुळे या भागातील रेल्वेच्या वाहतुकीला गती येणार आहे. यासोबतच राज्यात तीन नवीन क्रॉसिंग स्टेशन्स उभारण्याचा प्रस्ताव असून या प्रकल्पांना मूर्त स्वरूप आल्यावर प्रवासी आणि मालवाहतूक क्षमता आणखी वाढणार आहे.