सावर्डे ग्रामसभेत पंचायत मंडळ, ग्रामस्थांत वाद

समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने संताप : पंचायत मंडळ बरखास्तीची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 mins ago
सावर्डे ग्रामसभेत पंचायत मंडळ, ग्रामस्थांत वाद

सावर्डे ग्रामसभेत योग्य उत्तर न मिळाल्याने पंचायत मंडळ आणि ग्रामस्थांत झालेला वाद. (संदीप मापारी)

सांगे : सावर्डे ग्रामपंचायतीची रविवारी झालेली ग्रामसभा विविध नागरी प्रश्नांवरून वादळी ठरली. अनेक महत्त्वाच्या विषयांवर पंचायत मंडळाकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत थेट पंचायत मंडळ बरखास्त करा, अशी मागणी केली. उपसरपंचांनी दिलेल्या उत्तरांमुळे वातावरण अधिकच तापले, परिणामी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
सभेच्या सुरुवातीलाच ग्रामस्थांनी गेल्या पाच महिन्यांपासून ग्रामसभा का घेतली नाही, असा जाब विचारला. सरपंच उन्नती नाईक रजेवर असल्याने उपसरपंच नितेश भंडारी यांनी सभेचे कामकाज सांभाळले. मात्र, प्रश्नांना बगल देणारी उत्तरे दिल्याने लोक अधिकच संतप्त झाले. मागील ग्रामसभेतील विषय अद्याप प्रलंबित असल्याने, केवळ प्रश्न मांडायचे आणि उत्तर न मिळता घरी जायचे का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
दुलबानगर आणि कष्टीमळ भागातील ७० हून अधिक लोकांनी पाण्यासाठी निवेदन दिले आहे. साळावलीचे पाणी साठवून या भागाला पाणीपुरवठा करणे शक्य असतानाही पंचायत रस दाखवत नसल्याचा आरोप उपेंद्र नाईक आणि आपा नाईक यांनी केला. त्यांनी याप्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मिराबाग आणि परिसरात ड्रग्जचे सावट असून तरुणाई धोक्यात येत असल्याचा मुद्दा गौतम भंडारी आणि स्वप्नील भंडारी यांनी उपस्थित केला.
या वादावर बोलताना पंच संजय नाईक यांनी सांगितले की, रस्ते, पाण्याचे प्रश्न आणि खोदलेला खड्डा या संदर्भात पंचायतीकडे निवेदने आली आहेत. दुलबानगर आणि कष्टीमळ येथील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी आमदार गणेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
कुडचडे आरोग्य केंद्रावर आज मोर्चाचा इशारा
मिराबाग येथील बंधाऱ्याचा प्रश्न सभेच्या केंद्रस्थानी होता. मुख्यमंत्र्यांनी बंधारा प्रकल्प रद्द केला असून तो खड्डा बुजवण्याचे आश्वासन लेखी दिले होते, तरीही तो अद्याप का बुजवला नाही? असा प्रश्न संकेत भंडारी यांनी विचारला. पंचायतीला लोकांच्या प्रश्नांचे काहीच सोयरसुतक नसल्याचा आरोप करत, या मुद्द्यावर १३ तारखेला कुडचडे येथील आरोग्य केंद्रावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.      

हेही वाचा