पीएनजी गॅस नसल्याचे संबंधितांकडून स्पष्ट; अद्याप चाचणीच सुरू

मडगाव: फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमनजीक पीएनजी गॅस वाहिनीचे काम सुरू आहे. शनिवारी रात्री उशिरा या वाहिनीतून गॅस गळतीसारखा आवाज येऊ लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. मात्र, अद्याप चाचणी सुरू असून वाहिनीमध्ये गॅस नसल्याचे संबंधित कंत्राटदाराने स्पष्ट केले.
नेहरू स्टेडियमनजीक पीएनजी वाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास वाहिनीच्या व्हॉल्व्हमधून गॅस बाहेर येत असल्यासारखा मोठा आवाज येऊ लागला. यामुळे परिसरात गॅस गळती होत असल्याची भीती निर्माण झाली. स्थानिक नगरसेवक जॉनी क्रास्टो यांनाही तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
त्यानंतर गॅस वाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदाराला बोलावण्यात आले असता, त्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले. वाहिनीचे काम अद्याप पूर्ण झालेले नसून सध्या तिची चाचणी घेतली जात आहे. या ठिकाणी बॅरिकेट्स लावलेले होते, परंतु कोणीतरी ते हटवल्याने त्यावरून वाहन गेले. परिणामी, एअर व्हॉल्व्हमधून केवळ हवा बाहेर येत होती, असे ठेकेदाराने स्पष्ट केले. वाहिनीत अजून गॅस पुरवठा सुरू झालेला नाही, असे समजल्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडला. भविष्यात आवश्यक काळजी घेऊनच काम करण्याच्या सूचना नगरसेवक आणि स्थानिकांनी यावेळी दिल्या.