फोंडा विधानसभा पोटनिवडणूक रद्द तर, लुथरा बंधूंची जामिनावर सुटका

पणजी : ओंकार हत्तीने कडशी भागात प्रवेश केल्यानंतर कडशी भागात शेती, बागायतीचे नुकसान केले. आरोग्य केंद्राच्या बनावट दाखला प्रकरणी लुथरा बंधूंची जामिनावर सुटका करण्यात आली. फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भातील भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेली अधिसूचना बेकायदेशीर असल्याचे नमूद करत गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने ही पोटनिवडणूकच रद्द केली. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार

ओंकार हत्तीचा कडशी भागात धुमाकूळ
ओंकार हत्तीने कडशी भागात प्रवेश केला असून तो शेती, बागायतीची नासधूस करत आहे. त्याच्या हालचालींवर वन खात्याचे कर्मचारी आणि स्थानिक शेतकरी लक्ष ठेवून आहेत. वन खात्याचे कर्मचारी हत्तीला महाराष्ट्रात हाकलू पहात आहेत. महाराष्ट्राचे वन कर्मचारी, शेतकरी त्याला आपल्या हद्दीत येऊ देत नाहीत.
घोगळ येथील वाईन शॉपला आग लागून नुकसान
घोगळ येथे झुडिओ मॉलसमोरील इमारतीतील वाईन शॉपला आग लागली. मडगाव अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत दुकानातील फर्निचर, फ्रीज, एसी, वायरिंगसह मद्याच्या बाटल्यांचे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले.
दुचाकी अपघातात पतीपत्नी गंभीर जखमी
गुडी पारोडा येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात पतीपत्नी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. मडगाव येथून ईस्टरच्या पार्टीवरुन परतणार्या युवकाने धडक दिल्याने हा अपघात घडला. मायना कुडतरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
सोमवार

दोनापावलातील अपघातात युवती जागीच ठार
दोनापावला येथील मणिपाल रुग्णालयाजवळ ‘मिनी कूपर’ या आलिशान कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. अपघातात मोटरसायकलवरील दीक्षा पारवाडकर (२३, मूळ रा. कर्नाटक) हिचा जागीच मृत्यू झाला. मोटरसायकल चालक डी. अरुण (रा. मडगाव, मूळ चेन्नई) गंभीर जखमी झाला. पणजी पोलिसांनी कारचालक डॅरियस डायस (२२, रा. चिकोळणा, बोगमाळो-वास्को) याला अटक केली आहे.
वैद्यकीय चाचणीस नकार दिलेल्या युवतीचा जबाब नोंद
कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणात वैद्यकीय चाचणी करण्यास नकार दिलेल्या युवतीचा न्यायदंडाधिकाऱ्यांनी जबाब नोंद केला आहे. कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित सोहम नाईक याच्या विरोधात आतापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील चार गुन्हे पीडितांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आले आहे.
मंगळवार
मॅनेजरनेच कट रचून व्यापाऱ्याला लुटले
ईडीचे अधिकारी असल्याचे सांगून माकाझन येथून व्यावसायिकाचे अपहरण केले. कारवार येथे नेऊन त्याचे ३ लाख रुपये लुटले. या प्रकरणात कॅनरा बँकेच्या माकाझन शाखेच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासात व्यवस्थापकानेच सहकाऱ्यासोबत मिळून कट रचून पैसे लुटल्याचे समोर आले आहे.
मुरगावातील शिवरायांचा पुतळा हटवण्याची नामुष्की
मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (एमपीए) जागेत उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा महत्त्वपूर्ण आदेश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. अतिक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या यंत्रणेने मदत केलीच नाही, उलट अतिक्रमण करणाऱ्यांसोबत अप्रत्यक्षपणे संगनमत केले, असे गंभीर निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले.

बायणा समुद्रकिनाऱ्यावर स्पोर्ट्स उपकरणांची तोडफोड
मुरगाव तालुक्यातील बायणा समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्यक्तींनी वॉटर स्पोर्ट्सच्या उपकरणांची तोडफोड केली. या प्रकारामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी स्थानिक व्यावसायिकांनी केली.
बुधवार
फोंडा विधानसभा पोटनिवडणूक रद्द
फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भातील भारतीय निवडणूक आयोगाने १५ मार्च २०२६ रोजी जारी केलेली अधिसूचना बेकायदेशीर असल्याचे नमूद करत गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने ही पोटनिवडणूकच रद्द केली. हा आदेश भारतीय निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार, १५ दिवसांसाठी स्थगित ठेवण्यास न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला.
प्राध्यापिकेचा अपघातात मृत्यू
साहाय्यक प्राध्यापिका सुचिता सुनील बांदेकर (२७, लोलये पोळे) यांचा अपघातात मृत्यू झाला. माशे येथे त्यांच्या दुचाकीला एका कारने धडक दिली. या अपघातात सुचिता चालवत असलेल्या दुचाकीचा चक्काचूर झाला.
लुथरा बंधू जामिनावर मुक्त
‘बर्च’ बाय रोमियो लेन नाईट क्लबला उत्पादन शुल्क परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट ‘ना हरकत’ दाखला तयार केल्याच्या आरोपाखालील गुन्ह्यात क्लबचे मालक गौरव लुथरा व सौरभ लुथरा यांची म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी सशर्त जामिनावर सुटका केली.
गुरुवार
तिसवाडीतील अल्पवयीनावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप
तिसवाडी तालुक्यातील १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केल्याप्रकरणी मूळ उत्तरप्रदेशातील असलेल्या आरोपीला जन्मठेप आणि तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वैद्यकीय अहवाल सकारात्मक आला असून, आरोपीने घटनेनंतर कोणताही पश्चात्ताप न बाळगता मूळ गावी जाऊन विवाह केला, असे निरीक्षण नोंदवून ही शिक्षा देण्यात आली.
बिल्डरच्या कार्यालयातून २.८० लाखांची रोकड चोरीला
फातोर्डा येथील केएफसी इमारतीतील ‘एल अँड एल’ डेव्हलपर्सच्या कार्यालयात घुसून अज्ञात व्यक्तीने २.८० लाखांची रोकड चोरी केली. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
शुक्रवार
नवजात बालकांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला कारची धडक
वेर्णा बायपासवर नवजात बालकांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला विरुद्ध दिशेने येऊन एका कारने जोरदार धडक दिली. मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने ही रुग्णवाहिका जात असताना वेर्णा बगल रस्त्यावर हा अपघात झाला. सुदैवाने, या भीषण धडकेनंतरही रुग्णवाहिकेतील सर्व नवजात बालके आणि वैद्यकीय कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पेटके-धारबांदोडा येथील अपघातात स्कूटरचालकाचा मृत्यू
पेटके-धारबांदोडा येथे शुक्रवारी रात्री कंटेनर आणि स्कूटर यांच्यात झालेल्या अपघातात गुरुदास वाडकर (६२, बेतकी-खांडोळा) या स्कूटर चालकाचा गाडीखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी फोंडा - बेळगाव मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली.
ओला सीईओविरोधातील वॉरंट उच्च न्यायालयाकडून रद्द
ओला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीचे सीईओ भविश अग्रवाल यांच्याविरोधात दक्षिण गोवा जिल्हा ग्राहक मंचाने जारी केलेले समन्स आणि वॉरंट मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांनी हा आदेश दिला.
शनिवार
दाबोळी विमानतळावरील टर्मिनल-२ मधील स्टोअर रूमला आग
दाबोळी विमानतळावरील टर्मिनल-२ मधील स्टोअर रूमला अचानक आग लागली. आग वेळीच विझवल्याने मोठा अनर्थ टळला. आग विझवण्यासाठी टर्मिनल-२ चा काही भाग काही मिनिटांसाठी बंद ठेवण्यात आला.
सोहम नाईकला ३ दिवसांची पोलीस कोठडी
कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयित सोहम नाईकला केपे प्रथमवर्ग न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. क्राईम ब्रांचने शुक्रवारी त्याला तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली होती.
अपघातात दोन तरुणी जखमी
धारबांदोडा परिसरात अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. बाजारपेठ परिसरात एका अज्ञात भरधाव वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या. धडक दिल्यानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.
लक्षवेधी
ओशेल शिवोली येथे आकाश नार्वेकर यांच्या घरातून मोबाईल चोरल्याच्या आरोपाखाली हणजूण पोलिसांनी संशयित आरोपी अखिलेश कुमार (३५, रा. ओशेल शिवोली व मूळ उत्तर प्रदेश) याला अटक केली. त्याच्याकडून १ लाख रुपये किमतीचे सहा मोबाईल जप्त केले.
फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी टपाल मतदानाची (पोस्टल बॅलट) प्रक्रिया पूर्ण झाली. १७६ पैकी १७१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
आल्तो पर्वरी-पिळर्ण येथील एका ७० वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला एचडीएफसी बँकेचा केवायसी तपशील अद्ययावत करण्याच्या बहाण्याने २.१० लाख रुपयांना गंडवण्यात आले. याप्रकरणी साळगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बेकायदेशीर बांधकामांसंदर्भात गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करून घेतलेल्या स्वेच्छा जनहित याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. या प्रकरणी १०० हून अधिक पंचायतींनी बेकायदेशीर बांधकामांसंदर्भात अहवाल सादर न केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. याची दखल घेऊन संबंधित पंचायत सचिवांवर चार आठवड्यांत कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पंचायत संचालकांना दिले आहेत.