मनी लाँड्रिंगचा आरोप : सायबर गुन्हा पोलिसांकडून एकाला अटक

म्हापसा : पणजी येथील एका व्यक्तीची ‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमातून ६० लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात सायबर गुन्हा शाखेने संशयित आरोपींपैकी अक्षय सुरेश निकम (३२, रा. तराळे, सातारा महाराष्ट्र) याला अटक केली. फिर्यादींकडून उकळलेल्या ६० लाखांपैकी ४६ लाख रुपये रक्कम संशयिताच्या बँक खात्यामध्ये जमा झाली होती.
सीबीआय मुंबई आणि दंडाधिकारी असल्याचे भासवून फिर्यादींची लुबाडणूक करण्यात आली होती. हा डिजिटल अरेस्टचा प्रकार फेब्रुवारी २०२६ मध्ये घडला होता. याबाबत फिर्यादींनी २० फेब्रुवारी रोजी सायबर गुन्हा शाखेत तक्रार दाखल केली होती.
अज्ञात संशयितांनी प्रथम फिर्यादींशी व्हॉटस्अॅप कॉलच्या माध्यमातून संपर्क साधत उसणे पैसे घेतल्याचा खोटा आरोप केला होता. नंतर संशयितांनी तक्रारदाराला मनी लाँड्रिंग प्रकरणात गुंतल्याचा आरोप केला आणि ते आपल्या निगराणीखाली असल्याचे व्हिडिओ कॉलच्या मार्फत सांगितले. संशयित आरोपींनी व्हिडिओ कॉलवेळी सीबीआय मुंबई आणि दंडाधिकार्यांचा वेष धारण केला होता.
सदर कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी तक्रारदारावर दबाव टाकला आणि धमकावून ६० लाखांची मागणी केली होती. फिर्यादींनी ही रक्कम आयसीआयसी बँकेच्या दोन खात्यांमध्ये हस्तांतरित केली होती.
पोलिसांनी केलेल्या चौकशीवेळी या गुन्ह्यातील हस्तांतरित केलेल्या रकमेतील एक बँक खाते हे सातारा महाराष्ट्र येथील एका व्यक्तीच्या नावे असल्याचे आढळून आले. त्यानुसार, पोलीस पथक तिथे पाठवण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने संशयित आरोपी अक्षय निकम याला पकडून अटक केली.
पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल पोळेकर, हवालदार अनय नाईक व कॉन्सटेबल विनय आमोणकर या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
संशयिताच्या खात्यात ३.१० कोटी रुपये
संशयित आरोपीच्या बँक खात्यात एकूण ३.१० कोटी रुपये हस्तांतरित झाल्याचे दिसून आले. जी रक्कम गोव्यासह मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक येथील एकूण १२ सायबर गुन्ह्यांशी जोडलेली आहे आणि डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून ती उकळली गेली होती.