तुये येथील बेकायदा चिरेखाणीप्रकरणी जमीनमालकांना जप्तीच्या नोटिसा

संतापाची लाट : घरांसह खासगी वाहनांच्या जप्तीच्या नोटिसा

Story: विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th May, 11:45 pm
तुये येथील बेकायदा चिरेखाणीप्रकरणी जमीनमालकांना जप्तीच्या नोटिसा

पेडणे : खाण आणि भूगर्भ खात्याकडून बेकायदा चिरेखाणी प्रकरणी महसूल वसुली प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर पेडणेचे मामलेदार रणजीत साळगावकर यांनी तुये येथील जमीनमालकांना घरांच्या तसेच खासगी वाहनांच्या जप्तीच्या नोटिसा पाठवल्याने गावात खळबळ उडाली आहे. तलाठ्यामार्फत या नोटिसा पाठविण्याचे काम सुरू असून लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटिसा जमीनमालकांना देण्यात आल्या आहेत.

जमिनी सामूहिक असल्याने सर्वांनाच नोटिसा जारी झाल्या असून, त्यामुळे संताप आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुये गावातील अनेक कुटुंबांचा पारंपरिक व्यवसाय म्हणून चिरेखाणी सुरू होत्या. कायदेशीर परवान्यांसाठी प्रस्ताव पाठवूनही मंजुरी मिळाली नाही. बांधकामासाठी चिरे आणि रेतीची प्रचंड मागणी असल्याने राज्यभरात बेकायदा चिरेखाणी व्यवसाय सुरू आहे. या व्यवहारांतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली जाते.

तक्रार दाखल करणाऱ्यांना जमीनमालकांसह सरकारी यंत्रणाही वेठीस धरते. तक्रारीनंतर अधिकारी उघडपणे खाण व्यवसायिकांची बाजू घेतात. अनेकदा अशा तक्रारींमुळे कौटुंबिक वाद, तंटे आणि हाणामारीची प्रकरणे घडली आहेत. तलाठ्याकडून माहिती मामलेदारांना देणे अपेक्षित असताना तलाठ्यामार्फतच नोटिसा पाठवल्या जात असल्यामुळे कायद्याची थट्टा होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. मामलेदारांकडे तसेच खाण खात्याकडे तक्रारी करूनही कारवाई होत नाही. उलट आता वसुलीसाठी घरांवर आणि खासगी मालमत्तांवर जप्ती केली जात आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

सरकारी जमिनींतील चिरेखाणींचे काय?

तुये गावातील सरकारी जमिनीतही मोठ्या प्रमाणात बेकायदा चिरेखाणी व्यवसाय आहेत. खासगी जमिनीतील चिरेखाणींची वसुली केली जाते, तर सरकारी जमिनींतील चिरेखाणींची वसुली सरकारी अधिकाऱ्यांकडून केली जाणार काय, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. 

हेही वाचा