‘बर्च’ला ईडीचा पुन्हा दणका; ११ कोटींची मालमत्ता जप्त

हडफडे आग दुर्घटनाप्रकरणी मनी लाँडरिंगअंतर्गत कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th May, 11:55 pm
‘बर्च’ला ईडीचा पुन्हा दणका; ११ कोटींची मालमत्ता जप्त

पणजी : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये २५ जणांचा होरपळून मृत्यू झालेल्या हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या आस्थापनावर ईडीने पुन्हा एकदा जप्तीची कारवाई केली आहे. बेकायदेशीर कामकाजाशी संबंधित तपासाच्या अनुषंगाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत ११.०१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता ईडीने तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे. यामुळे या प्रकरणातील एकूण जप्त आणि गोठवण्यात आलेली मालमत्ता २९.०५ कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे.
हा तपास ६ डिसेंबर २०२५ रोजी हडफडे येथे घडलेल्या आणि २५ जणांचा बळी घेणाऱ्या आगीच्या दुर्घटनेशी संबंधित एफआयआरशी होता. तसेच विविध परवानग्या मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याच्या आरोप बर्चवर आहे. या आस्थापनेने अग्निसुरक्षा ना-हरकत प्रमाणपत्रासह इतर अनिवार्य परवानग्या नसतानाही कामकाज सुरू ठेवले होते. तसेच मार्च २०२४ मध्ये व्यापारी परवाना मुदतबाह्य होऊनही त्यांनी आपला व्यवसाय अव्याहतपणे चालू ठेवला. आर्थिक वर्ष २०२३-२४ ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत या आस्थापनाने अंदाजे २९.७८ कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. ही रक्कम मनी लॉडरिंंग कायद्यांतर्गत गुन्ह्यातून मिळवलेली संपत्ती म्हणून निश्चित करण्यात आली आहे.
‘बर्च बाय रोमीओ लेन’ या क्लबला डिसेंबरमध्ये आग लागली होती. या आगीत २५ जणांंना होरपळून मरण आले होते. या क्लबकडे कोणतेही आवश्यक परवाने नव्हते. व्यापारी परवान्याची मुदत सुद्धा संंपली होती. या दुर्घटनेनंंतर सरकारने सर्व क्लब्सचे परवाने तपासण्याची मोहीम सुरू केली होती. पोलिसांकडून आरोपपत्र दाखल झाले असताना ईडीकडूनही कारवाई सुरूच आहे.

आतापर्यंत २९ कोटींची मालमत्ता जप्त
* ईडीने या प्रकरणाशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे मारून महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली होती, तसेच ५९ लाख रुपयांचे बँक व्यवहार गोठवले होते.
* यापूर्वी ईडीने या प्रकरणात १७.४५ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्याचा आदेश जारी केला होता.
* आता नव्याने जप्त केलेल्या ११.०१ कोटींसह एकूण जप्त मालमत्ता २९.०५ कोटी रुपये झाली आहे.

२५ बळी घेणाऱ्या क्लबचा कारभार बेकायदा‍

- बर्च क्लबमध्ये ‘इलेक्ट्रिक फायर क्रॅकर्स’मुळे लागलेल्या आगीत धुरामुळे गुदमरून २५ पर्यटकांसह कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

- या तपासामध्ये हा हाय-प्रोफाइल क्लब एका मूळ मिठागराच्या जागेवर बेकायदेशीरपणे बांधल्याचे उघड झाले. तसेच तेथे आग विझवण्याची कोणतीही यंत्रणा नव्हती.

- या निष्काळजीपणाबद्दल सरकारने तत्कालीन पंचायत संचालक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, हडफडे पंचायतीचे सरपंच आणि सचिवांना निलंबित केले होते. क्लबचे मालक गौरव व सौरभ लुथरा यांच्यासह संबंधितांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे.