‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणी एकाला खंडाळातून अटक

तिसवाडीतील महिलेला घातलेला १४ लाखांचा गंडा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th May, 10:13 pm
‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणी एकाला खंडाळातून अटक

मानवी तस्करीच्या गुन्ह्यात कागदपत्रे जोडलेली आहेत असे सांगून आणि स्वतःला ईडी व सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून, ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली करंजाळे, तिसवाडी येथील एका महिलेला १४ लाखांना लुबाडण्यात आले. याप्रकरणी सायबर गुन्हे विभागाने सखोल तपास करत संशयित आरोपी योगेश कांतीलाल शाह (वय ४५, रा. खंडाळा, महाराष्ट्र) याला अटक केली आहे. हा फसवणुकीचा प्रकार १४ जानेवारी ते २२ जानेवारी २०२६ या काळात घडला होता.

‘सिग्नल’ अॅपवरून संपर्क; अधिकाऱ्यांचे सोंग

अज्ञात संशयित आरोपींनी ‘सिग्नल’ अॅपच्या माध्यमातून फिर्यादी महिलेशी संपर्क साधला आणि स्वतःला ईडी व सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवले. बंगळुरूमध्ये तिच्या नावाने जारी केलेले आणि कार्यरत असलेले एक मोबाईल सिम कार्ड, आधारकार्ड आणि एटीएम कार्ड मानवी तस्करीच्या एका प्रकरणाशी जोडलेले आहेत, असे सांगून तिची दिशाभूल केली.

‘डिजिटल अरेस्ट’चा दबाव टाकून फसवणूक

या कारणास्तव तिला ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे सांगून कथित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी आरोपींनी तिच्यावर मोठा दबाव टाकला. मानसिक तणाव निर्माण करून आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

अॅक्सिस बँकेत वळवली १४ लाखांची रक्कम

आरोपींच्या दबावाला बळी पडून तक्रारदार महिलेला आरटीजीएसच्या माध्यमातून संशयितांनी आपल्या अॅक्सिस बँकेच्या खात्यामध्ये १४ लाख रुपये हस्तांतरित करण्यास भाग पाडले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करत सातारा (महाराष्ट्र) येथील संशयिताचा ठावठिकाणा शोधून स्थानिक पोलिसांच्या मदतीने योगेश शाह याला अटक केली.

इतर राज्यांतील सायबर प्रकरणांशीही खाते जोडले

पोलीस चौकशीमध्ये संशयिताचे बँक खाते पश्चिम बंगाल आणि गोव्यातील इतर सायबर फसवणुकीच्या प्रकरणांशी जोडल्याचे आढळून आले असून, या खात्यात फसवणुकीची एकूण ६५.५० लाख रुपये रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे.

सायबर पोलिसांची समन्वित कारवाई

पोलीस अधीक्षक राजू राऊत देसाई आणि सहायक अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंदार गावकर, कॉन्स्टेबल महेश नाईक व संताराम नर्से यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनुष्का पै बीर या करत आहेत.