पणजी :पणजी महानगरपालिकेने ३० मे रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या ‘इनफ इज इनफ’ चळवळीच्या सभेची परवानगी मागे घेतली आहे. याच दिवशी गोवा घटक राज्य दिवस असल्याने राज्य सरकारने तेथे प्रदर्शनाचे आयोजन केले असून यामुळे सभा घेणे शक्य नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र, दिलेली परवानगी अवघ्या पाच दिवसांत रद्द केल्याने सरकार या चळवळीला घाबरत आहे, अशी टीका आयोजक फ्रान्सिस कोएल्हो यांनी केली.
सभेच्या तयारीनंतर अचानक निर्णय
सभेला ना हरकत दाखला मिळण्यासाठी १६ मे रोजी अर्ज करण्यात आला होता. महापालिकेने २१ मे रोजी परवानगी दिल्यानंतर पोलीस व अन्य आवश्यक परवानेदेखील घेण्यात आले होते. सभेची पूर्वतयारी करत राज्यभरातील व्यक्तींना आमंत्रित केले असताना अचानक २५ मे रोजी महापालिकेने पत्र पाठवून परवाना रद्द केल्याचे कळवले. ३० मे रोजी घटक राज्य दिनानिमित्त प्रदर्शन असल्याने हा निर्णय घेतल्याचे महापालिकेने सांगितले आहे, अशी माहिती फ्रान्सिस कोएल्हो यांनी दिली.
सरकारी नियोजनावर आयोजकांचे प्रश्नचिन्ह
पणजी महापालिकेला ३० मे रोजी आझाद मैदानावर प्रदर्शन होणार असल्याची माहिती आधी नव्हती का आणि प्रदर्शन अचानकपणे भरवण्याचा निर्णय का घेण्यात आला, याची उत्तरे गोवा सरकार व महापालिकेने देणे आवश्यक आहे, असे फ्रान्सिस कोएल्हो यांनी सांगितले.


