किरकोळ वादामुळे पित्याने केली माहेरी आलेल्या मुलीची हत्या!

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
11 hours ago
किरकोळ वादामुळे पित्याने केली माहेरी आलेल्या मुलीची हत्या!

कल्याण : कल्याण पश्चिम येथील दुधनाका-पारेकरवाडा परिसरातील 'रचना रॉयल' इमारतीत एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ५० वर्षीय जन्मदात्या बापानेच आपल्या २५ वर्षीय पोटच्या विवाहित मुलीची धारदार आणि टोकदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या केली. या थरारक घटनेमुळे संपूर्ण कल्याण-डोंबिवली परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे. गायत्री अक्षय शिंदे (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव असून, विनोद वसईकर (वय ५०) असे फरार संशयित पित्याचे नाव आहे. याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गायत्रीचे नोव्हेंबर २०२५ मध्ये लग्न झाले होते. ती काही दिवसांपूर्वीच दुधनाका येथे तिच्या माहेरी आली होती. रविवारी (दि. २४) सर्व कुटुंबीय एकत्र चित्रपट पाहून आले होते. त्यानंतर सोमवारी (दि. २५) गायत्री आणि तिचे वडील विनोद हे दोघेच घरी होते. सोमवारी रात्री गायत्रीची आई कामावरून घरी परतली असता, त्यांना घराचे मुख्य दार उघडे दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता गायत्री रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेली होती. हे भीषण दृश्य पाहून आईला मोठा धक्का बसला. काही अज्ञात कारणावरून झालेल्या वादातून विनोद याने गायत्रीच्या कपाळावर टोकदार शस्त्राने गंभीर वार केले, ज्यात अतिरक्तस्रावामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धक्कादायक बाबी समोर आल्या. आरोपी विनोद वसईकर हा सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेल्याचे नाटक करून घरातून बाहेर पडला, मात्र काही वेळाने तो पुन्हा गुपचूप घरी परतला. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास तो अत्यंत घाईघाईने इमारतीमधून बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या पुराव्यावरून पित्यानेच हा खून केल्याचा संशय बळावला.

मृत गायत्रीचे पती अक्षय शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित विनोद वसईकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून कौटुंबिक वाद, मानसिक स्थिती की अन्य काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके वेगवेगळ्या भागात रवाना केली असून, त्याला लवकरच जेरबंद केले जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. 

हेही वाचा