पर्वरीतील एचडीएफसी बँकेच्या खातेधारक कंपनीला घातला होता गंडा

म्हापसा : पर्वरी येथील एचडीएफसी बँकेच्या एका खातेधारक कंपनीचे बनावट लेटरहेड आणि धनादेश सादर करून २८.५० लाख रुपये रक्कम हस्तांतरित करुन गंडा घालण्यात आला होता. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी पाटणा बिहार येथून संशयित आरोपी अभय कुमार यादव (२५) याला अटक केली.
संशयिताच्या खात्यामध्ये फसवणुकीतील १४ लाख रुपये रक्कम जमा झाली होती. सदर बँक खाते पोलिसांनी गोठवले आहे. या प्रकरणातील इतर दोघा संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत.
हा आर्थिक फसवणुकीचा प्रकार दि. २९ एप्रिल ते दि. ३० एप्रिल २०२६ दरम्यान घडला आहे. त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापक स्वाती नाईक यांच्या तक्रारीच्या आधारे पर्वरी पोलिसांनी ४ मे रोजी भा. न्या. सं.च्या ३१८(४), ३१९(२), ३३६(३), ३३८ व ३४०(२) कलमान्वये गुन्हा नोंद केला होता.
घटनेच्या दिवशी फिर्यादी बँक व्यवस्थापकांशी एका संशयिताने संपर्क साधला. आपण इम्पोरियम ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड (स्कोडा शोरूम) या आस्थापनाचा संचालक आहोत. आपल्याला तत्काळ २८.५० लाख रुपये रक्कम तीन वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये पाठवायची आहे, असे सांगून व्हॉटस्अॅपवर धनादेश आणि कंपनीच्या लेटरहेडवर विनंतीपत्र पाठवले. त्यानंतर फिर्यादींनी ही रक्कम लगेच संबंधित बँक खात्यामध्ये हस्तांतरीत केली.
फिर्यादींनी यासाठी कंपनीच्या लेटरहेडवर विनंती पत्र पाठवण्यास सांगितले. तेव्हा संशयिताने बनावट लेटरहेडवर विनंती पत्र तक्रारदारांना व्हॉटस्अॅप केले आणि दुपारी हे पत्र बँकेत आणून देतो असे भासवले.
हा धनादेश किंवा लेटरहेडची पडताळणी व सत्यता न करता फिर्यादींनी आरटीजीएस करत वरील आस्थापनाच्या खात्यातील २८ लाख ५० हजारांची रक्कम संशयिताने दिलेल्या तीन बँक खात्यांमध्ये हस्तांतरीत केली.
नंतर सत्यता पडताळणीवेळी सदर धनादेश आणि कंपनीचे लेटरहेड बनावट असल्याचे आढळून आले. तेव्हा पोलिसांत धाव घेण्यात आली.
ही फसवणुकीची रक्कम हस्तांतरीत झालेले बँक खाते अभय कुमार यादव याचे असल्याचे समजल्यावर पोलीस पथक पाटणामध्ये पाठवण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयिताला पकडले व अटक करून गोव्यात आणले. शनिवार, २३ रोजी संशयित आरोपीला म्हापसा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, विश्वेश कर्पे व निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंदार परब, सिताराम मळीक, कॉ. भिकाजी परब, हेमंत गावकर व सिद्धेश नाईक या पथकाने ही कामगिरी केली.
फसवणुकीची रक्कम बिहारमधील खात्यात जमा
ही फसवणुकीची रक्कम हस्तांतरीत झालेले एक बँक खाते हे पाटणा बिहारमधील असल्याचे पोलीस चौकशीत आढळून आले होते. सदर खात्यामध्ये २८.५० लाखांपैकी १४ लाख रुपये रक्कम हस्तांतरीत झाली होती. हे बँक खाते अभय कुमार यादव याचे असल्याचे समजल्यावर पोलीस पथक पाटणामध्ये पाठवण्यात आले.