‘गोवन वार्ता’चे अजय लाड, सचिन दळवी यांना ‘गुज’चे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

‘प्रुंडट मीडिया’चे लौकिक शिलकर, रोहित वाडकर, शिरीष कुंकळ्ळेकर, चेतन गावस, विक्रम नाईक, स्वप्नील तारी यांचाही समावेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
‘गोवन वार्ता’चे अजय लाड, सचिन दळवी यांना ‘गुज’चे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

पणजी : गोवा श्रमिक पत्रकार संघटनेतर्फे (गुज) आयोजित वार्षिक पत्रकारिता पुरस्कारांमध्ये ‘गोवन वार्ता’ने आपली वेगळी छाप सोडली आहे. वर्ष २०२३, २०२४ आणि २०२५ अशा तीन वर्षांसाठी विविध श्रेणींमध्ये जाहीर झालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांमध्ये ‘गोवन वार्ता’चे अजय लाड यांना २०२४ आणि २०२५ या दोन्ही वर्षांसाठी, तर सचिन दळवी यांना २०२४ या वर्षासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘गुज’तर्फे क्रीडा, पर्यावरण, गुन्हेगारी, ग्रामीण आणि शोधपत्रकारिता अशा विविध १३ श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते. यंदा संघटनेने गेल्या तीन वर्षांचे (२०२३, २०२४ आणि २०२५) पुरस्कार एकत्र जाहीर केले असून, यात ‘गोवन वार्ता’च्या पत्रकारांसह गोव्यातील आघाडीच्या विविध वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांमधील पत्रकारांनी आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.
ग्रामीण पत्रकारितेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘सुरेश वाळवे स्मृती पुरस्कार’ ‘गोवन वार्ता’चे अजय लाड यांना सलग दोन वर्षांसाठी जाहीर झाला आहे. वर्ष २०२४ साठी ‘कृषी प्रशिक्षणाने डेरिकाला दाखवला स्वयंपूर्णतेचा मार्ग’ या विशेष वृत्तासाठी आणि वर्ष २०२५ साठी ‘वार्का येथील जेसनच्या नवसंकल्पना सत्यात, गवतकापणी यंत्राची निर्मिती’ या वृत्त मालिकेसाठी जाहीर झाला.
तसेच, वर्ष २०२४ चा क्रीडा पत्रकारितेचा बहुमान ‘गोवन वार्ता’चेच सचिन दळवी यांनी पटकावला आहे. त्यांना ‘अस्तित्वात नसलेल्या मैदानावर २.४८ कोटींचा खर्च’ या क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकणाऱ्या शोधपत्रकारितेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
या त्रिस्तरीय पुरस्कारांमध्ये गोव्यातील इतर प्रमुख प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांनीही विविध श्रेणींमध्ये यश मिळवले आहे. प्रुडन्ट मीडियातील लौकिक शिलकर, रोहित वाडकर, शिरीष कुंकळ्ळेकर, चेतन गावस, विक्रम नाईक आणि स्वप्नील तारी, द टाइम्स ऑफ इंडियातील राकेश मुंडये, गौरी मळकर्णेकर, न्यूटन सिक्वेरा, शर्मिला कुतिन्हो आणि मार्कुस मेरग्युलाव, द नवहिंद टाइम्समधील हेमंत परब, वहाब खान, भीवा परब आणि डायना फर्नांडिस, दैनिक गोमंतक व गोमंतक टीव्हीतील सुशांत कुंकळयेकर (दैनिक गोमंतक) आणि भीमाशंकर पाटील (गोमंतक टीव्ही), हेरॉल्ड टीव्हीतील उपेंद्र नाईक यांना तर दैनिक लोकमतमधील गणेश शेटकर यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
दीर्घकाळ ग्रामीण भागात राहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारिता करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांच्या योगदानाचाही ‘गुज’तर्फे विशेष गौरव केला जाणार आहे. त्यानुसार, ज्येष्ठ पत्रकार मोहन वेर्णेकर, श्रीपाद सामंत आणि राजेश चोडणकर यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘सुरेश वाळवे स्मृती सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

हेही वाचा