आरजीपीचे मनोज परब यांचा राजीनामा, तर वीरेश बोरकरांना ‘कारणे दाखवा’

पणजी : पक्षविरोधी कारवायांप्रकरणी आमदार वीरेश बोरकर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. यानंतर झालेल्या घडामोडीनंतर ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टी’चे प्रमुख मनोज परब यांनी पक्षाचे अध्यक्षपद आणि संस्थापक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. चिकणे कुडणेत महिलेची घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. ‘बीएमडब्ल्यू’च्या चालकाने तीन गाड्यांना उडवले. याशिवाय अपघाती मृत्यू, चोरीच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार

आमदार वीरेश बोरकरांना ‘कारणे दाखवा’
पक्षविरोधी कारवायांप्रकरणी आमदार वीरेश बोरकर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी आमदार वीरेश बोरकर यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे दोघांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. काही दिवसांपासून मनोज आणि वीरेश यांच्या समर्थकांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
‘डिजिटल अरेस्ट’द्वारे सासष्टीतील वृद्धाला ८० लाखांना लुटले
सासष्टी तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला खंडणीच्या प्रकरणाशी, बेकायदेशीर जाहिरातबाजीच्या कृत्यांमध्ये तसेच मानवी तस्करीत गुंतल्याचे सांगून ‘डिजिटल अरेस्ट’ द्वारे ८० लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने सदर व्हॉट्सअॅप मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
आके बायश ग्रामसभेत वादंग
बांधकाम प्रकल्पातील अनियमितता, मोठ्या प्रकल्पांना दिली जाणारी मंजुरी आणि स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून आके बायश ग्रामसभेत माजी सरपंच सिद्धेश भगत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. गृहनिर्माण प्रकल्पातील कथित घोटाळ्यावरून सिद्धेश भगत आणि पंचायत सचिव संदीप हलयाळी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. भगत यांनी पंचायतीचे पत्र फाडून निषेध व्यक्त केला.
सोमवार
मोरजी समुद्रात बुडालेल्या रुपेश आजगावकर यांचा मृतदेह सापडला
मोरजी येथील समुद्रात स्नान करण्यासाठी गेलेले आणि बेपत्ता झालेले नानोडा-डिचोली येथील रुपेश प्रभाकर आजगावकर (वय ४५) यांचा मृतदेह कामुर्ली-शापोरा नदीत सापडला. मित्रांसोबत आणि कुटुंबीयांसमवेत समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले असता ही घटना घडली.
‘आप’चे गोवा प्रभारी दीपक सिंगला यांना ईडीकडून अटक
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या कथित बँक फसवणूक आणि वित्तीय गैरव्यवहार प्रकरणात आम आदमी पक्षाचे (आप) गोवा प्रभारी दीपक सिंगला यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांना अटक केली आहे. ईडीच्या पथकांनी गोव्यातील दोनापावला आणि दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली.
भाजप कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यात धडक
सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी कारापूर येथील मेगा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच भाजपविरोधात आक्षेपार्ह आणि अपशब्द वापरल्याचा आरोप करत डिचोली, साखळी आणि मये मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी डिचोली पोलिस ठाण्यावर धडक देत तातडीने कारवाईची मागणी केली.
मंगळवार
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने गोव्यात ६.५१ कोटींची फसवणूक
वॉट्सअॅप ग्रुप आणि बनावट ट्रेडिंग अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून राज्यातील तिघांची तब्बल ६.५१ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तिसवाडी, फोंडा आणि सासष्टी तालुक्यातील नागरिकांना गंडा घालण्यात आला असून, याप्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

चिकणे कुडणेत महिलेची घरात घुसून निर्घृण हत्या
साखळी मतदारसंघातील चिकणे कुडणे गावात एका ५५ वर्षीय महिलेची घरात घुसून बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली. महिलेच्याच घरात सतत ये-जा करणाऱ्या एका ओळखीच्या युवकाने हे कृत्य केले असून, तो महिलेचा मोबाईल आणि गळ्यातील सोनसाखळी घेऊन पसार झाला आहे.
एचडीएफसी फस्ट बँक खातेधारकाला १.९१ लाखांचा गंडा
रामनगर बेती येथील एचडीएफसी फस्ट बँक खातेधारक युवकाला १.९१ लाख रुपयांना अज्ञात संशयिताने गंडा घातला. याप्रकरणी साळगाव पोलिसांत काशीमाली बेल्लार (३१) याने तक्रार दिली आहे.
बुधवार

‘बीएमडब्ल्यू’च्या चालकाने तीन गाड्यांना उडवले
दोनापावला सर्कलजवळ मंगळवारी मध्यरात्री एका भरधाव आलिशान ‘बीएमडब्ल्यू एम ३४० आय’ कारने रस्त्यावरील तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पिर्ण येथील ‘अष्टगंधा’ पतसंस्थेत ११.२८ कोटींचा घोटाळा
बार्देश तालुक्यातील पिर्ण येथील 'अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड' या पतसंस्थेत तब्बल ११ कोटी २८ लाख ९३ हजार २१३ रुपयांची प्रचंड अफरातफर केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने मोठी कारवाई करत पतसंस्थेचे माजी संचालक प्रकाश कांदोळकर (वय ७०, रा. वायडोंगर, पार्से-पेडणे) यांना १९ मे रोजी त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली.
बेतोडा बगलमार्गावर गव्याची धडक बसून कारचे नुकसान
बेतोडा येथील बगल मार्गावर मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या गव्याची धडक कारला बसली. यात कारचे मोठे नुकसान झाले. कारची धडक बसून गवा जखमी होण्याची शक्यता असल्याने वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी कॉम्बिंग ऑपरेशनला सुरुवात केली आहे.
मालीम-बेती येथील छाप्यात ७.९७ लाख रुपयांचे हेरॉईन जप्त
गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने मालीम-बेती येथील मासळी मार्केट परिसरात अमली पदार्थ तस्करी प्रकरणी धडक कारवाई केली. या प्रकरणी अर्जुन बिश्वकर्मा (३६) आणि चेतकांत ओली (२५) या दोघा नेपाळी युवकांना अटक केली. त्यांच्याकडून ७.९७ लाख रुपये किमतीचे ३९.८८ ग्रॅम हेरॉईन जप्त केले.
गुरुवार
बँक मॅनेजरच्या अतिउत्साहीपणामुळे कंपनीला २८.५० लाखांचा गंडा
बँक खातेधारक कंपनीच्या लेटरहेड आणि धनादेशाची सत्यता न पडताळताच २८.५० लाख रुपये हस्तांतरित केल्याने पर्वरी येथील एचडीएफसी बँकेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बँकेच्या महिला व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीवरून पर्वरी पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध बनावटगिरी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मनोज परब यांचा राजीनामा
‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टी’चे (आरजीपी) प्रमुख मनोज परब यांनी पक्षाचे अध्यक्षपद आणि संस्थापक सदस्यत्वाचा राजीनामा देत सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली. २०२२ नंतर ही चळवळ राजकीय मार्गावर पुढे सरकली आणि पक्षात सत्तेचा मोह सुरू झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असून, पक्षाने त्यांचा हा राजीनामा स्वीकारला आहे.
हडफडे अपघातातील दुचाकीस्वाराचे निधन
हडफडे येथे कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात जखमी सूर्यकांता कर (३३, रा. बागा कळंगुट व मूळ ओडिशा) या दुचाकीस्वाराचे उपचारादरम्यान निधन झाले. अपघातास कारणीभूत कार चालक केदार राजाबाबू डायस (३६, रा. मडगाव) याच्याविरूद्ध हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवार
नानोडा येथे अपघातात एक ठार
अस्नोडा ते दोडामार्ग या मुख्य रस्त्यावर सेलेब्रेशन रेस्टॉरंटजवळ ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. नानोडा येथील प्रशांत लाडू केरकर हा युवक अस्नोडा येथून नानोडाच्या दिशेने जात होता. तर ट्रक दोडामार्ग ते मुळगाव येथे जात असताना नानोडा येथे सेलिब्रेशन रेस्टॉरंटजवळ रस्त्यावर दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली.
बीएमडब्ल्यू कार चालकाला प्रतिबंधात्मक अटक
नापावला येथील रस्त्यावर मंगळवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवून तीन वाहनांना धडक देण्यात आली होती. त्यातील नुकसान झालेल्या कार मालकांनी तक्रार दिली नव्हती. तर, बीएमडब्ल्यू कार चालकाला प्रतिबंधात्मक अटक करून उपजिल्हाधिकाऱ्यांकडे हजर करण्यात आले.
कासावली-मोले येथे पर्यटकांच्या वाहनाला भरधाव बसची धडक
मोले-कासावली येथे एका भरधाव बसने पर्यटकांच्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात तामिळनाडूतील एका गरोदर महिलेसह पाच जण जखमी झाले. अपघातग्रस्त वाहनाचे चालक निजाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील होसूर येथून त्यांचे कुटुंब पर्यटनासाठी गोव्यात आले होते.
शनिवार
कोलवाळ कारागृहात कैद्याला मारहाण
कोलवाळ कारागृहात कैदी राकेश पाटील याला काही कैद्यांकडून मारहाण करण्यात आली. त्याला उपचारार्थ गोमेकॉत पाठवण्यात आले.
मडगावात धोकादायक इमारतीचा भाग पाडला
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार मडगावातील सिने लतानजीकच्या होली फॅमिली हाउसचा धोकादायक भाग पाडण्यात आला होता. यानंतर आता पिंपळकट्टा येथील डायस इमारतीचा पडायला आलेला भाग शुक्रवारी रात्री पाडण्यात आला. मडगावात सुमारे २१ धोकादायक इमारती आहेत.
बोर्डे-डिचोलीतील सिया कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग
डिचोली तालुक्यातील बोर्डे येथील सिया कॉम्प्लेक्स इमारतीतील एका फ्लॅटला अचानक आग लागून आतील सामान जळून खाक झाले. घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
लक्षवेधी
बार्देश तालुक्यातील साळगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात १६ मे २०२६ रोजी रात्री ९.१० वा. साळगाव पोलीस स्थानकात पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवला.
सडा ते हार्बर मार्गावर रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर कापून संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू असताना, सोमवारी अचानक मोठी दरड कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला. मनोरंजन मिंद (वय ४५) असे या मृत कामगाराचे नाव आहे.
एकोशी पोबुर्फा येथे अनंत साळगावकर यांचे घर चोरांनी फोडले. घरामध्ये घुसून कपाटातील सुमारे ५ लाखांचे दागिने लंपास करण्यात आले.
मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या बायणा वसाहतीतील एका इमारतीच्या गच्चीवर असलेली १६ लाख रुपये किमतीची पाच यंत्रे चोरीस गेली. सदर यंत्रे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मालकीची असून याप्रकरणी मंडळाचे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक अँथोनी मिरांडा यांनी मुरगाव पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली आहे.
हणजूण येथे एका हंगामी बांधकामाच्या छतावर पत्र्यांच्या शेडच्या कामासाठी वापरलेले ड्रील मशीन खाली उतरताना विजेचा धक्का लागून माला रघुराम चांद (२९, रा. हरवळे साखळी व मूळ राजस्थान) या सुतारकाम करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाला.