१.६९ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण; संशयित शिवाजी जाधवचा जामीन अर्ज फेटाळला

दुसऱ्या प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
१.६९ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण; संशयित शिवाजी जाधवचा जामीन अर्ज फेटाळला

म्हापसा : ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून १.६९ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी गोवा पोलिसांच्या (Goa Police) आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) (Economic offense cell)  अटक केलेले पुणे येथील हरिओम मल्टीस्टेट सहकारी पतपुरवठा सोसायटी लिमिटेडचे चेअरमन शिवाजी जाधव याचा जामीन अर्ज उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायाधीश विजया आंब्रे यांनी फेटाळून लावला. तसेच संशयिताचा दुसऱ्या एका प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने नामंजूर केला आहे. 

न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील नारायण कळंगुटकर यांनी तर संशयिताच्या वतीने ॲड. रोहन देसाई यांनी युक्तिवाद केला. फिर्यादी माया हरीजन याच्यासह विल्मा फर्नांडिस, आयजॅक इसाक डिसोझा, चैतन्य प्रकाश ऑडिच्या आणि इतरांनी आर्थिक गुन्हा विभागात तक्रार दाखल केली होती. वरील सहकारी पतपुरवठा सोसायटीचे पुण्यात मुख्यालय असून; त्यांनी २०१६ मध्ये गोव्यात पाटो पणजी येथे शाखा उघडली.

त्यांनी गोवा शाखा प्रमुख व इतर कर्मचाऱ्यांची तसेच स्थानिक एजंटाची भरती केली. त्यानंतर गोव्यातील गुंतवणूकदारांना ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून कायम ठेव व इतर योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. यामुळे तक्रारदारांनी सोसायटीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. 

याच दरम्यान कायम ठेव व इतर योजनेची मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांनी जमा केलेली रक्कम काढण्यासाठी सोसायटीकडे संपर्क साधला, तेव्हा ती बंद असल्याचे समोर आले. गुंतवणूकदारांना आपली फसवणूक जाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ईओसीत तक्रार दाखल केली.

तक्रारीची दखल घेऊन पोलीस निरीक्षक नीलेश शिरोडकर यांनी वरील सोसायटीसह, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर संचालकांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४२० व १२० बी आणि २२ अनियमित ठेव योजनेवर बंदी घालण्याचा कायदा २०१९ (बीयुडीएस)अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

याच दरम्यान मुख्य सूत्रधार तथा सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी जाधव याची माहिती मिळाली. त्यानुसार, ईओसीचे अधीक्षक अर्शी आदिल आणि उपअधीक्षक फ्रान्सिस कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नीलेश शिरोडकर यांनी संशयित जाधव याला अटक केली होती.


हेही वाचा