आज होणार दोघांवरही अंत्यसंस्कार, अनेकांकडून श्रद्धांजली

पणजी : कला व संस्कृती खात्याचे माजी संचालक मोर्तू व्ही. नाईक यांचे दु:खद निधन झाले. त्याचबरोबर ज्येष्ठ नाट्यकर्मी, सिने कलाकार, कोंकणी लेखक तथा निवृत्त शिक्षक संजय तळवडकर यांचे दु:खद निधन झाले. आज शनिवारी दोघांवरही नजीकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मोर्तू नाईक यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार
कला व संस्कृती खात्याचे माजी संचालक, दयानंद कला केंद्राचे अध्यक्ष, राज्य पुरस्कार विजेते मोर्तू व्ही नाईक यांच्यावर आज शनिवारी दुपारी १२ वाजता आनंदवाडी स्मशानभूमीत अंतिम संस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
संजय तळवडकर यांच्यावर मडगावात होणार अंत्यसंस्कार
संजय तळवडकर हे आपल्या हसतमुख स्वभावामुळे आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या व्यक्तिमत्त्वामुळे ओळखले जात होते. लेखन क्षेत्रात त्यांनी आपल्या खुसखुशीत आणि विनोदी शैलीने वेगळी छाप पाडली होती. ‘सुनापरान्त’ दैनिकातील खाद्यसंस्कृतीवर आधारित त्यांचा स्तंभ वाचकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरला होता. त्यांच्या ‘घोस्त’ आणि ‘भूस बरो दीस बरो’ या पुस्तकांनाही मोठी पसंती मिळाली होती.
नाट्य क्षेत्रात विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. नाटकांमधील अभिनय आणि योगदानासाठी त्यांचा गौरव करण्यात आला होता. शिक्षक म्हणूनही त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
त्यांचे पार्थिव आज सायंकाळी ४ वाजता पावर हाऊस, आके, मडगाव येथील निवासस्थानावरून अंत्ययात्रेसाठी नेण्यात येणार आहे. पाजीफोंड, मडगाव येथील मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दोघांनाही अनेकांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.