गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात देखरेखीखाली

वास्को : चिखली येथील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चचे धर्मगुरू फादर बोलमॅक्स परेरा यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. त्यांना तत्काळ बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची तब्बेत स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी वास्को रेल्वे स्थानकावर असताना फादर बोलमॅक्स अचानक बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून वैद्यकीय अधिकारी उपचार करत आहेत. फा. बोलमॅक्स परेरा यांना ह्दयविकाराचे त्रास होते व त्यांनी त्यावर उपचारही केलेले होते. त्यांच्या प्रकृतीबद्दलची अधिक माहिती अद्याप हाती आलेली नाही.
पॅरिश कौन्सिल व इतर असोसिएशनची सहल कुळे येथे जाणार होती. त्यासाठी फा. बोलमॅक्स परेरा हे देखील इतरांसह वास्को रेल्वेस्थानकावर गेलेले असताना, अचानक फा. बोलमॅक्स यांना अस्वस्थ वाटू लागले व ते खाली पडत असताना जवळ असलेल्या युवकांनी त्यांना पकडले. फा. बोलमॅक्स यांना ह्दयविकाराचा त्रास असल्याने त्यांना तत्काळ इस्पितळात नेल्यात आले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केली.
त्यानंतर पुढील उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. त्याठिकाणी ईसीजी, सीटीस्कॅन, एक्सरे असे आवश्यक सर्व चाचण्या केल्या. त्यांची तब्बेत आता स्थिर असून ते पहिल्यासारखे हसतखेळत आहेत. यापूर्वी त्यांची बायपास सर्जरी झालेली असल्याने प्रकृती स्थिर असली तरीही त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलेले आहे.