
मडगाव : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार मडगावातील सिने लतानजीकच्या होली फॅमिली हाउसचा धोकादायक भाग पाडण्यात आला होता. यानंतर आता पिंपळकट्टा येथील डायस इमारतीचा पडायला आलेला भाग शुक्रवारी रात्री पाडण्यात आला. मडगावात सुमारे २१ धोकादायक इमारती आहेत.
दक्षिण गोवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानुसार मान्सून कालावधीत कोणत्याही प्रकारची वित्त व जीवितहानी न होण्यासाठी मडगावातील जुन्या व जीर्ण इमारतींचा काही भाग पाडण्यात आला आहे.
दक्षिण गोवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस यांच्या नेतृत्वाखाली मडगावातील डायस बिल्डिंग आणि होली फॅमिली हाऊसचे धोकादायक भाग पाडण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. मान्सून कालावधीत कोणतीही दुर्घटना घडू नये आणि जीवित-वित्तहानी टाळण्यासाठी धोकादायक इमारती पाडण्याऐवजी तात्पुरत्या स्वरुपात इमारतींचा रस्त्यांकडील धोकादायक भाग पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.
मडगाव उपजिल्हाधिकार्यांनी मडगाव नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मामलेदार यांच्या पथकासह यापूर्वी केलेल्या पाहणी अहवालाच्या आधारे जिल्हाधिकार्यांनी हे आदेश दिले होते. मडगावात सुमारे २१ धोकादायक इमारती असून; त्यांची पाहणी करुन आवश्यक त्या इमारतींचा काही भाग पाडण्यात येणार आहे.
मडगाावात गेल्यावर्षी पावसाळ्यात होली फॅमिली हाउस व डायस बिल्डींग या दोन्ही इमारतींचे काही सज्जे किंवा भाग कोसळले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पिंपळकट्टा येथील इमारतीच्या बाजूला आणि सिने लता रस्त्यावरील इमारतीच्या या भागांत बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तपासणी अहवालानुसार डायस बिल्डिंगचा लटकलेला भाग धोकादायक स्थितीत असल्याने त्वरित पाडणे आवश्यक आहे.
होली फॅमिली हाऊसच्या तळमजल्यावरील बाल्कनीचा धोकादायक भागही पाडण्याचे निर्देश देण्यात आले होते. मडगावातील जुन्या इमारतीचा काही भाग अत्यंत धोकादायक अवस्थेत लटकत होता. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेचा विचार करून, आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार हा भाग हटवण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.