
पणजी : तीव्र मतभेद असलेले व यापूर्वी एकमेकांवर बरेच आरोप केलेले मंत्री रमेश तवडकर व आमदार गोविंद गावडे हे एसटी समाजाचे नेते प्रेरणा दिनाच्या तयारीच्या निमित्ताने शनिवारी एकत्र आले. सोमवारी २५ रोजी केपे येथे प्रेरणा दिनाचा कार्यक्रम होणार आहे.
प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी बैठक घेतली. या बैठकीला सभापती गणेश गावकर, प्रेरणा दिन आयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, आमदार गोविंद गावडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेरणा दिनाच्या सोमवारी होणारी कार्यक्रमात एसटी समाजाचे सर्व नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित असतील. मी व गोविंद गावडे तसेच मी व प्रकाश वेळीप यांच्यात आता कोणतेही मतभेद राहिलेले नाहीत. समाजाच्या विकासासाठी व समाजाच्या कल्याणासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज आहे. मतभेदामुळे आजपर्यंत समाजाचे बरेच नुकसान झालेले आहे. निवडणूक नजरेसमोर ठेवून आम्ही एकत्र आलेलो नाही तर समाजाचे हित नजरेसमोर ठेवून आम्ही एकत्र आलो आहोत, असे मंत्री रमेश तवडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. समाजासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, अशी प्रतिक्रिया यावर सभापती गणेश गावकर यांनी व्यक्त केली होती. आमदार गोविंद गावडे यांनी जाहीरपणे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. तरीही मंत्री तवडकर यांच्या निमंत्रणावरून ते बैठकीला उपस्थित राहिले.
गोविंद गावडे हे कला संस्कृती खात्याचे मंत्री होते तेव्हा रमेश तवडकर हे सभापती होते. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अनुदान व इतर गोष्टीवरून दोघांमध्ये बऱ्याच वेळा आरोप प्रत्यारोप झाले होते. गेल्या वर्षी गोविंद गावडे याना मंत्रीपदावरून डच्चू देण्यात आला तर रमेश तवडकर याना मंत्रिपद देण्यात आले. गोविंद गावडे यांच्याकडे असलेली खातीच रमेश तवडकर याना देण्यात आली.