बांबोळी येथे बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

संशयित बस चालकाला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd May, 11:56 pm
बांबोळी येथे बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

म्हापसा : बांबोळी येथे प्रवासी बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ४५ वर्षीय अज्ञात पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत बस चालक देवेंद्र नाईक (३५, रा. पेन्हा दी फ्रान्स, पर्वरी) याला आगशी पोलिसांनी अटक केली.

अपघात बुधवार दि. २० रोजी सायंकाळी ७.३० वा. सुमारास तातोजवळ बांबोळी येथे घडला होता. पादचारी रस्ता ओलांडत होता. त्यावेळी दोनापावला ते बांबोळीच्या दिशेने जाणाऱ्या जीए ०७ टी २९७० क्रमांकाच्या बसने पादचाऱ्याला ठोकरले होते.

अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला होता. रुग्णवाहिकेतून त्याला गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना गुरुवार, दि. २१ रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस हवालदार राजेश नाईक यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित बस चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन हाकणे आणि सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवून त्याला शुक्रवारी अटक केली.

पुढील तपास पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक झाकीर हुसेन हे करीत आहेत.