जीमनंतर अचानक प्रकृती बिघडून २७ वर्षीय युवकाचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th April, 11:53 pm
जीमनंतर अचानक प्रकृती बिघडून २७ वर्षीय युवकाचा मृत्यू

वास्को : जीममधून घरी परतल्यावर अचानकपणे प्रकृती बिघडलेल्या सडा येथील गौरेश गोपाळ परब (२७) या युवकाचा शनिवारी उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर बोगदा येथील हिंदू स्मशानभूमीत शनिवारी सायंकाळी अंतिम संस्कार करण्यात आले.

गौरेश हा वीज खात्याचा कर्मचारी असून तो फातोर्डा- मडगाव विभागात कार्यरत होता. शनिवारी सकाळी जीममधून आल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याने आपल्या मित्राला फोन केला. मित्र आल्यावर गौरेश घामाघूम होऊन तेथेच कोसळला. मित्राने त्वरित कारमधून त्याला चिखली उपजिल्हा इस्पितळात नेले. तेथे गौरेशला मृत घोषित करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.

त्याच्या पश्चात आई, वडिल व बहिण असा परिवार आहे. गौरेशच्या आकस्मिक निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. 

हेही वाचा