धारबांदोड्यात 'हिट अँड रन'; दोन तरुणी गंभीर

अनोळखी वाहनाने दुचाकीला उडवले; एक तरुणी 'गोमेकॉ'त दाखल, फोंडा पोलिसांकडून तपास सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
45 mins ago
धारबांदोड्यात 'हिट अँड रन'; दोन तरुणी गंभीर

पणजी : धारबांदोडा परिसरात अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. आज शनिवार सकाळी बाजारपेठ परिसरात 'हिट अँड रन'ची एक घटना घडली. एका अज्ञात भरधाव वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या. धडक दिल्यानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुणी सकाळी आपल्या दुचाकीवरून जात असताना ही दुर्घटना घडली. धडक बसल्यानंतर दोन्ही तरुणी रस्त्यावर फेकल्या गेल्या. यापैकी एका तरुणीला गंभीर दुखापत झाली असून तिला तातडीने उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले. दुसऱ्या तरुणीवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून फरार वाहन आणि चालकाचा शोध घेतला जात आहे. धारबांदोड्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी आता स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.

दरम्यान पेटके-धारबांदोडा येथे काल शुक्रवारी रात्री कंटेनर आणि स्कुटर यांच्यात झालेल्या अपघातात गुरुदास वाडकर (६२, बेतकी-खांडोळा) या स्कुटर चालकाचा गाडीखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी फोंडा - बेळगाव मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली. 

एनएल ०१-एजे-२८१८ क्रमांकाचा कंटेनर मोलेहून पणजीच्या दिशेने जात होता. याचवेळी गुरुदास वाडकर हे धारबांदोडाहून फोंडा मार्गाने घरी जात होते. त्यावेळी अपघात घडला. स्कुटर चालक कंटेनरच्या टायर खाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यावर फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे व इतर कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळावर धाव घेतली. फोंडा पोलिसांनी अपघताचा पंचनामा करून मृतदेह मडगाव येथील इस्पितळात पाठवला.

गुरुदास वाडकर यांनी नुकतेच पानस - साकोर्डा येथे घर बांधले होते. शुक्रवारी बेतकी येथे गावातील देवस्थानात वर्धापनदिन असल्याने पत्नी व मुले तिथे गेली होती. मूळ गावात वर्धापनदिन असल्यामुळे गुरुदास वाडकर हे स्कुटर घेऊन जात असताना अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 


बातमी अपडेट होत आहे.