शिरगाव येथील श्री लईराई जत्रेच्या तयारीला वेग

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी घेतला आढावा : २१ पासून उत्सवाला प्रारंभ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th April, 11:52 pm
शिरगाव येथील श्री लईराई जत्रेच्या तयारीला वेग

डिचोली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री देवी लईराईची प्रसिद्ध जत्रा २१ एप्रिलपासून सुरू होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले असून, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी शनिवारी शिरगावला भेट देऊन तयारीचा सविस्तर आढावा घेतला. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जत्रेच्या निमित्ताने शिरगाव मंदिर मार्गावरील खराब रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचा शुभारंभ आमदार शेट यांच्या हस्ते करण्यात आला. भाविकांसाठी स्वतंत्र रांगा, दिशादर्शक फलक आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यावर विशेष भर दिला जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून नियोजनासाठी बैठकांचे सत्र सुरू असून, आता कामाला प्रत्यक्ष गती मिळाली आहे.


जत्रेदरम्यान गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी संपूर्ण परिसरात सुमारे ८४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, लाऊडस्पीकरद्वारे भाविकांना सतत सूचना दिल्या जातील. तसेच, पहिल्या दिवशी गावात मोक्याच्या ठिकाणी दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.
१८ एप्रिल रोजी ‘मॉक ड्रिल’
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, जत्रेची सर्व तयारी आठ दिवस आधी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी १८ एप्रिल रोजी सरकारी यंत्रणेतर्फे 'मॉक ड्रिल'चे आयोजन करण्यात आले आहे. सर्व यंत्रणांच्या समन्वयासाठी स्वतः आमदार प्रेमेंद्र शेट आता दररोज शिरगावला भेट देऊन पाठपुरावा करणार आहेत.
प्रशासनाकडून सहकार्याचे आवाहन
देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सर्व त्रुटी दूर करून भाविकांसाठी उत्तम व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगितले. भाविकांनी शिस्त पाळून आणि प्रशासनाला सहकार्य करून श्री देवी लईराईचे दर्शन घ्यावे, असे आवाहन आमदार प्रेमेंद्र शेट आणि देवस्थान समितीने केले आहे.

हेही वाचा