'स्कूल चले हम': निरंकालच्या कातकरी समाजाच्या १३ विद्यार्थ्यांनी प्रथमच ओलांडली 'चौथी'ची वेस

पाचवीत मिळवला प्रवेश; कातकरी समाजाच्या शैक्षणिक प्रवासात ऐतिहासिक टप्पा. मुलांच्या यशाने पालकांचे डोळे पाणावले; शिक्षकांच्या मेहनतीला फळ.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
22 mins ago
'स्कूल चले हम': निरंकालच्या कातकरी समाजाच्या १३ विद्यार्थ्यांनी प्रथमच ओलांडली 'चौथी'ची वेस

पणजी : अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण हे मानुष्याचे मूलभूत अधिकार आहेत. २१वे शतक उजाडले तरी भारतात आजही अनेक ठिकाणी शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचलेली नाही. दरम्यान फोंडा तालुक्यातील निरंकाल येथून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या येथील कातकरी समाजातील १३ मुलांनी यंदा 'चौथी'ची भिंत ओलांडून इयत्ता पाचवीसाठी प्रवेश निश्चित केला आहे. 

मुळात निरंकाल भागातील कातकरी समाज हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या पिछाडीवर असलेला घटक आहे. अनेकदा रोजगारासाठी होणारे स्थलांतर आणि सुविधांचा अभाव यामुळे या समाजातील मुलांचे शिक्षण प्राथमिक स्तरावरच सुटत असे. मात्र, यावर्षी १३ मुलांनी ही भिंत ओलांडली आहे. या मुलांनी स्थानिक प्राथमिक शाळेतून आपले चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून, आता ते पुढील शिक्षणासाठी स्थानिक 'गणनाथ हायस्कूल'मध्ये प्रवेश घेणार आहेत. यापूर्वी या समाजातील कोणत्याही मुलाने इतक्या मोठ्या संख्येने हायस्कूलपर्यंत मजल मारली नव्हती.

शिक्षकांच्या मेहनतीला यश

सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी या मुलांसाठी घेतलेली अपार मेहनत हे या यशाचे मुळ आहे. शिक्षकांनी केवळ मुलांना शिकवलेच नाही, तर त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या मुलांमध्ये निसर्गदत्त कला असून, ते 'कावी चित्रकलेत' (Kaavi Painting) अत्यंत पारंगत आहेत. कुंचल्याच्या सहाय्याने ही मुले आकर्षक आणि प्रभावीपणे चित्रे रेखाटतात, असे त्यांच्या शिक्षकांनी आवर्जून नमूद केले. शिक्षकांनी त्यांच्यातील या कौशल्याचे विशेष कौतुक केले आहे.

पालकांच्या आशा पल्लवित

पिढ्यानपिढ्या झोपड्यांमध्ये आणि अत्यंत साध्या परिस्थितीत राहणाऱ्या या पालकांच्या डोळ्यांत आता आपल्या मुलांच्या उज्वल भविष्याचे स्वप्न तरळू लागले आहे. आमच्याकडे स्वतःचे घरदार नाही, पण आमची मुले शिकून मोठी ऑफिसर व्हावीत, अशी इच्छा पालकांनी व्यक्त केली आहे. काही घरांमध्ये आजही विजेची पुरेशी सोय नाही, एका बल्बच्या प्रकाशात ही मुले शिक्षण घेत आहेत. तरीही, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या समस्या सोडवाव्यात, अशी भावना पालकांनी बोलून दाखवली.

प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा

शेकडो वर्षांपासून या भागात स्थायिक असलेला हा समाज आजही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी सरकारने विशेष सवलती आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. जर या मुलांना योग्य पाठबळ मिळाले, तर हा समाज मुख्य प्रवाहात येण्यास मोठी मदत होईल. शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, हा बदल केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नसून, संपूर्ण समाजाच्या प्रगतीची नांदी आहे. या यशामुळे कातकरी समाजातील इतर मुलांमध्येही शिक्षणाची गोडी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, गोव्यातील कातकरी समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी 'संवेदन केंद्र' आणि पेडणेच्या 'गणपत पार्सेकर शिक्षण महाविद्यालय' यांच्यात तीन वर्षांचा सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीत हा करार झाला. 'आयआरआयएस-एलडी' प्रकल्पांतर्गत कातकरी समुदायावर संशोधन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे.