बार्देश, डिचोलीसह पाच तालुक्यांत आयोजन; जिल्हाधिकारी अंकित यादव यांची माहिती

पणजी: उत्तर गोवा जिल्ह्यातील जमीन महसूल प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी जिल्हाधिकारी अंकित यादव (IAS) यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील बार्देश, डिचोली, पेडणे, सत्तरी आणि तिसवाडी या पाच तालुक्यांच्या मामलेदार कार्यालयांमध्ये प्रलंबित 'म्युटेशन' प्रकरणे हातावेगळी करण्यासाठी येत्या १८ आणि १९ एप्रिल २०२६ रोजी विशेष 'म्युटेशन डिस्पोजल अँड फॅसिलिटेशन कॅम्प'चे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या फाईल्स मार्गी लागण्याची शक्यता असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे विशेष कॅम्प शनिवार आणि रविवार सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:३० या वेळेत सुरू राहतील. ज्या नागरिकांची म्युटेशन प्रकरणे विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत, त्यांनी संबंधित मामलेदार कार्यालयात उपस्थित राहून आपल्या केसची सद्यस्थिती जाणून घ्यावी. तसेच, प्रलंबित राहण्यामागची कारणे समजून घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता किंवा स्पष्टीकरण सादर करण्याची संधी या कॅम्पच्या माध्यमातून दिली जाणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या कॅम्पचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या अर्जाचा तपशील, आवश्यक पूरक कागदपत्रे, ओळखपत्र, पेमेंट किंवा चलन तपशील आणि कार्यालयाकडून आलेला कोणताही पत्रव्यवहार सोबत ठेवणे अनिवार्य आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेच्या सोयीसाठी ही नोटीस जारी केली असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपली प्रलंबित कामे पूर्ण करून घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.