मुख्य सूत्रधार निदा खान फरार; 'एसआयटी'कडून नाशिकसह पुण्यात शोध सुरू

नाशिक: भोंदू कॅप्टन अशोक खरातच्या प्रकरणात दरदिवशी धक्कादायक खुलासे होत असतानाच नाशिक पुन्हा एका प्रकरणाने हादरले आहे. नाशिकमधील एका नामवंत बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे.
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकाराचा खोलवर तपास करण्यासाठी नुकतीच विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले असून, एचआर विभागाच्या एजीएमसह सात जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र, या रॅकेटमधील महत्त्वाची दुवा मानली जाणारी संशयित निदा खान अद्याप फरार असून, पोलीस तिचा नाशिक आणि पुण्यात कसून शोध घेत आहेत.
तक्रारीनुसार, या कंपनीतील काही उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमी असलेल्या हिंदू तरुणींना लक्ष्य केले. या महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि त्यांचा मानसिक छळ करण्यात आला. इतक्यावरच न थांबता, या तरुणींना सक्तीने धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचेही समोर आले आहे. फरार आरोपी निदा खान ही महिला असल्याने तिचा वापर हिंदू तरुणींना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्यासाठी आणि त्यांच्यावर तगादा लावण्यासाठी केला जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. २५ मार्च रोजी या प्रकरणातील पहिला गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर अनेक पीडितांनी धैर्याने पुढे येत तक्रारी दिल्या आहेत.

सध्या या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येत आहे. अटकेत असलेल्या सात आरोपींपैकी सहा टीम लीडर्सना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर एचआर अश्विनी चैनाणी यांची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी संशयितांचे मोबाईल जप्त केले असून तांत्रिक तपासातून अनेक धक्कादायक माहिती हाती येण्याची शक्यता आहे. मुख्य सूत्रधार निदा खानच्या अटकेनंतर या रॅकेटचे धागेदोरे कोठपर्यंत पसरलेले आहेत आणि यात आणखी किती लोकांचा सहभाग आहे, याचा उलगडा होईल. सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सखोल तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
