अमेरिकेचे १६०० कोटींचे हायटेक ड्रोन 'होर्मुझ'वरून गायब!

इराणच्या दिशेने वळताच रडारवरून संपर्क तुटला; शस्त्रसंधी आणि संभावित शांतता करार धोक्यात ?

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
56 mins ago
अमेरिकेचे १६०० कोटींचे हायटेक ड्रोन 'होर्मुझ'वरून गायब!

तेहरान/ इस्लामाबाद : अमेरिका आणि इराण यांच्यात नुकताच युद्धविराम जाहीर झालेला असतानाच एका गूढ घटनेने जगाच्या संरक्षण वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकन नौदलाचे अत्यंत प्रगत आणि महागडे 'MQ-4C ट्रायटन' हे निगराणी ड्रोन होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून अचानक गायब झाले आहे. पर्शियन आखातात गस्त घालून इटलीतील आपल्या तळाकडे परतत असताना या १६०० कोटींच्या ड्रोनने अचानक इराणच्या दिशेने झेप घेतली आणि त्यानंतर रडारवरून अदृश्य झाले. या घटनेमुळे शस्त्रसंधी तसेच संभावित शांतता करारावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले असून दोन्ही देशांतील तणाव पुन्हा टोकाला पोहोचण्याची शक्यता आहे.


Us Navy Mq4c Triton Drone Disappears Strait Of Hormuz Iran Tension -  सीजफायर के बीच बड़ा कांड…इमरजेंसी कोड भेजकर लापता हुआ अमेरिकी ड्रोन, ईरान  पर हैक करने का शक| Navbharat Live


हे ड्रोन केवळ एक यंत्र नसून अमेरिकेच्या सागरी निगराणीचा कणा मानले जाते. एका ड्रोनची किंमत सुमारे २०० दशलक्ष डॉलर्स (१६०० कोटी रुपयांहून अधिक) इतकी प्रचंड आहे. ५०,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर उडण्याची क्षमता असलेले हे ड्रोन सलग २४ तास हवेत राहून सागरी हालचालींवर अचूक नजर ठेवू शकते. उड्डाणादरम्यान या ड्रोनने अचानक '७७००' हा आपत्कालीन कोड पाठवला आणि त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. हे तांत्रिक बिघाडामुळे झाले की इराणने हे ड्रोन पाडले, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आले नसले तरी, ज्या पद्धतीने या ड्रोनने इराणच्या सीमेच्या दिशेने मार्ग बदलला, ते पाहून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.


Image


विशेष म्हणजे, इराणसोबतच्या या संघर्षात अमेरिकेला आधीच मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. आकडेवारीनुसार, अमेरिकेला या भागात तैनात राहण्यासाठी दर सेकंदाला सुमारे १०,३०० डॉलर्स खर्च करावे लागत आहेत. मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स, गुप्तचर यंत्रणा आणि सागरी सुरक्षेवर रोज कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असतानाच इतके महागडे ड्रोन गमावणे ही अमेरिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.  


Image


इराणच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी भेट

आज पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये उभय देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वाची चर्चा नियोजित असतानाच ही घटना घडली आहे. दरम्यान आज इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बागेर घालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास आराघची यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची भेट घेतली. अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत असून, या महत्त्वाच्या चर्चेत द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक शांततेवर भर देण्यात आला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी खुली करण्याचे मान्य केले होते, मात्र या ड्रोन प्रकरणाने पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.


हेही वाचा