कोठडीतील संशयितांच्या आरोग्याची काळजी घेण्यास जीएमसी सक्षम!

सत्र न्यायालयाचे निरीक्षण : ८.३४ कोटींच्या ड्रग्जप्रकरणी संशयिताचा जामीन फेटाळला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th April, 11:57 pm
कोठडीतील संशयितांच्या आरोग्याची काळजी घेण्यास जीएमसी सक्षम!

पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ हे भारतातील सर्वांत जुन्या वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक असून सर्व आवश्यक वैद्यकीय उपकरणे तसेच तज्ज्ञ डॉक्टर आणि उत्तम वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना अंतिम क्षणी उद्भवणाऱ्या वैद्यकीय गुंतागुंतींमुळे येथे हलवून विशेष वैद्यकीय लक्ष देऊन उपचार केले जातात, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने विदेशातून आणलेल्या ८.३४ कोटी ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक केलेला संशयित तन्मय जाधव (३८, पुणे) याला वैद्यकीय कारणावर आधारित जामीन अर्ज फेटाळून लावला. याबाबतचा आदेश सत्र न्या. विजया आंब्रे यांनी दिला.

कस्टमच्या गोवा विभागाने २५ मार्च रोजी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा प्रयत्न उधळून लावत पाच प्रवाशांना अटक केली होती. त्यांच्याकडून ८ कोटी ३४ लाख १२ हजार रुपयांचा २३.८३२ किलो हायड्रोफॉनिक विड हा उच्च दर्जाचा गांजा जप्त केला.

गोवा विभागाच्या कस्टम अधिकाऱ्याला २५ मार्च रोजी मस्कतहून आलेल्या विमानातून ड्रग्ज तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, अधिकाऱ्यांनी प्रवासी तसेच त्यांच्या साहित्याची तपासणी सुरू केली. यावेळी पाच प्रवाशांवर संशय आला. त्यांनी थायलंडहून मस्कतमार्गे गोव्यात आलेल्या पुणे येथील तन्मय जाधव आणि माधुरी नायडू या दोघांची चौकशी केली. अबूधाबीहून आलेल्या सीमा (३७, हरयाणा) तसेच मुंबईहून आलेल्या अमीर खान (३१,मुंबई) आणि अंसारी साजिद (३४, मुंबई) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या साहित्याची झडती घेतली असता, ८ कोटी ३४ लाख १२ हजार रुपयांचा २३.८३२ किलो हायड्रोफॉनिक विड हा गांजा सापडला. हा गांजा जप्त करण्यात आला. त्यानंतर वरील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केली असता, न्यायालयाने संशयितांना न्यायालयीन कोठडी ठोठावली.

दरम्यान, तन्मयची तब्येत बिघडल्याने त्याला गोमेकॉत दाखल केले होते. याच दरम्यान त्याने न्यायालयात वैद्यकीय कारण समोर करून जामीन मंजूर करण्याची मागणी केली.

या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, कस्टमतर्फे विशेष अभियोक्ता व्ही. भंडारी यांनी बाजू मांडली. संशयिताची अँजिओग्राफी करण्यात आली आहे. त्याला अँजिओप्लास्टी करण्याची सूचना डॉक्टरांनी केली आहे. तसेच तो तिथे अँजिओप्लास्टी करण्यास तयार नसल्याचे माहिती दिली. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून जामीन अर्ज फेटाळून लावला.

तन्मयला गोमेकॉत केले होते दाखल

तन्मय जाधव याची तब्येत बिघडल्याने त्याला प्रथम म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल केले. त्यानंतर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात भरती करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. याच दरम्यान संशयिताने न्यायालयात वैद्यकीय कारण समोर करून जामीन मंजूर करण्याची मागणी केली. 

हेही वाचा