मळा तलावातील ऑक्सिजनचे प्रमाण घटल्याने माशांचा मृत्यू?

अहवालानंतर होणार नेमके कारण स्पष्ट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th April, 11:55 pm
मळा तलावातील ऑक्सिजनचे प्रमाण घटल्याने माशांचा मृत्यू?

पणजी : पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे मळा तलावातील माशांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतरच माशांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय खात्याच्या संचालक डॉ. शमिला मोंतेरो यांनी दिली.

मळा तलावात मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळल्याने मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी तलावाच्या परिसरात मासे फडफडताना दिसून आले. दोन दिवसांपूर्वीपर्यंत तलावातील मासे सुरक्षित होते. काही नागरिकांनी जिवंत मासे पकडून नेले होते. मात्र शनिवारी अचानक मोठ्या प्रमाणात मृत मासे तलावाच्या काठावर दिसून आल्याने एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच मत्स्यव्यवसाय खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत माशांचे नमुने आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तपास अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.

मळा तलावात मानशीचे पाणी येते. या पाण्याची योग्य हालचाल न झाल्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असावे आणि त्यामुळे मासे मृत्यूमुखी पडले असावेत, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी घातपाताची शक्यताही व्यक्त केली आहे. कोणीतरी तलावात घातक रसायन किंवा विषारी पदार्थ टाकल्यामुळे मासे मृत्यू पावले असावेत, असा संशय व्यक्त होत असून, या दृष्टीनेही प्रदूषण नियंत्रण मंडळ तपास करत आहे.

यापूर्वी २०११ सालीही मळा तलावात अशाच प्रकारे माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

हेही वाचा