बोडगिणी-म्हापसा येथील खुनानंतर पोलिसांकडून बेघरांची नोंदणी मोहीम

आतापर्यंत ८३ जणांची नोंदणी : क्षुल्लक कारणावरून झाली होती हत्या

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15 mins ago
बोडगिणी-म्हापसा येथील खुनानंतर पोलिसांकडून बेघरांची नोंदणी मोहीम

म्हापसा : बोडगिणी येथे झालेल्या अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा छडा पोलिसांनी लावला असून त्याची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही. खुनाच्या पार्श्वभूमीवर म्हापसा पोलिसांनी शहरातील बेघर व्यक्तींची यादी तयार करण्याची विशेष मोहीम राबवली आहे. आतापर्यंत ८३ जणांची नोंदणी या मोहिमेंतर्गत करण्यात आली.

खून झालेला अज्ञात व्यक्ती तसेच संशयित सावंगखोबा सिंग हे बेघर आहेत. ते कदंब बसस्थानकावर किंवा जवळील बोडगिणी येथे खुल्या जागी वास्तव्यास होते. खून झालेल्या व्यक्तीला याठिकाणी राहत असलेले सर्वजण बेघर हे ‘रवी’ या नावानेच ओळखत होते. मात्र, त्याचे पूर्ण नाव किंवा गाव याची माहिती कुणालाही नव्हती. त्यामुळे या मृताची ओळख पटवण्याचे काम म्हापसा पोलिसांसमोर उभे आहे.

भविष्यात म्हापसा शहर परिसरात वास्तव्यास असलेल्या बेघरांसोबत अशा प्रकारची घटना घडल्यास त्यांची ओळख पटवण्याच्या कामात अडचण येऊ नये, यासाठी पोलिसांनी शहरात राहणाऱ्या बेघरांची यादी तयार करण्याची मोहीम सुरू केली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत पोलिसांनी एकूण ८३ लोकांची नोंदणी केली. सदर व्यक्तींचे नाव, मूळ पत्ता आणि नातेवाईकांची माहिती या यादीमध्ये नोंदवून घेतली जात आहे.

दरम्यान, २८ मार्च रोजी सकाळी ८ वा. सुमारास म्हापसा पोलिसांना बोडगिणी येथे मरडच्या बाजूने कान कापलेला मृतदेह आढळला होता. शवचिकित्सा अहवालात त्याची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते.

प्रथम पोलिसांना मृताची ओळख पटवण्यात अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी गुप्तहेरांच्या मदतीने संशयिताची ओळख पटवली व दि. ३ एप्रिल रोजी सावंगखोबा चाओबा सिंग (४३, रा. बोडगिणी व मूळ बिन्नाकंडी आसाम) याला शिताफीने अटक केली. संशयित आरोपी देखील त्याला ‘रवी’ या टोपण नावानेच ओळखत होता. त्यांची बस स्थानकाच्या आवारातच काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती.

पार्टीवेळी ताटात चिकन कमी वाढल्याच्या कारणावरून रवी व संशयितांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात बिअरच्या बाटलीने संशयिताने रवीवर हल्ला केला. नंतर फोडलेली बिअरची बाटली कानामध्ये घुसवली. नंतर संशयिताने पार्टीस्थळी असलेला तिसऱ्या मित्रासोबत घटनास्थळावरून पळ काढला होता. २७ मार्च रोजी ही घटना घडली होती.

मृताची ओळख अद्याप नाही!

बोडगिणी येथे खून झालेल्या व्यक्तीची अजून ओळख पटलेली नाही. आगामी काही कालावधीत देखील ओळख पटवणे शक्य न झाल्यास मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्याचबरोबर अशा बेघरांची ओळख पटवण्याच्या दृष्टीने नोंदणी मोहीम राबवली आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 

हेही वाचा