पणजी येथील हॉटेलमधील घटना

पणजी : गुजरातमधील एका व्यावसायिकाला दारू पाजून बेशुद्ध केल्यानंतर सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून १५ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. ही घटना पणजी येथील ‘रेजेंटा इन पालासिओ दे गोवा’ या हॉटेलमध्ये घडली.
याप्रकरणी पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अहमदाबाद, गुजरात येथील तोमेश सतेंद्र यादव यांनी याबाबत तक्रार दिली. दि. ८ एप्रिल २०२६ रोजी पणजी येथील हॉटेलमध्ये संशयित महिला रुपश्री सी. (बंगळुरू, कर्नाटक) हिने तक्रारदाराशी मैत्री केली. यानंतर त्या महिलेने तक्रारदाराला हॉटेलची खोली बुक करण्यास प्रवृत्त केले. खोलीमध्ये गेल्यानंतर तिने तक्रारदाराला जबरदस्तीने दारू पाजून बेशुद्ध केले. ही संधी साधून महिलेने त्याच्या अंगावरील सुमारे ४०.५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे, ५० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व २ लाख ४० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १५ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यानंतर ती महिला तेथून फरार झाली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन नाईक करीत आहेत.