गब्बर सहानी खूनप्रकरणी राजकुमार प्रसादला सशर्त जामीन

२०२३ मधील प्रकरण : राजेंद्र प्रसाद याचा जामीन अर्ज फेटाळला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th April, 11:51 pm
गब्बर सहानी खूनप्रकरणी राजकुमार प्रसादला सशर्त जामीन

पणजी : मिर्झापूर -उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादातून चंद्रिका उर्फ गब्बर सहानी (३२, रा. उत्तर प्रदेश) याचा आॅगस्ट २०२३ मध्ये खून करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित तथा गब्बर याचा चुलतभाऊ राजकुमार प्रसाद याला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने ५० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला तर राजेंद्र प्रसाद याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

जुने गोवा पोलिसांना २७ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी दांडो-करमळी येथील मानशीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला असता, पर्वरी पोलीस स्थानकात २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रिका उर्फ गब्बर सहानी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार, पोलिसांनी संबंधित तक्रारादाराला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावले असता, त्याने मृतदेह गब्बरचा असल्याचा सांगितले. तसेच काही महिन्यांपूर्वी गब्बरचे मिर्झापूर (उत्तर प्रदेश) येथे जमिनीच्या वादावरून चुलत भावांसोबत भांडण झाल्याची माहिती दिली. माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याचे चुलत भाऊ राजेंद्र प्रसाद, रणजीत प्रसाद, राजकुमार प्रसाद या तिघांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी गब्बरला मारहाण केल्यानंतर गवंडाळी पुलावरून पाण्यात फेकून दिल्याची कबुली दिली.

पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी गब्बरच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल करून राजेंद्र प्रसाद, रणजीत प्रसाद, राजकुमार प्रसाद यांच्यासह अखिलेश कुमार साहनी या चाैघांना अटक केली. पोलिसांनी तपास पूर्ण करून पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात वरील संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल केले. याच दरम्यान राजकुमार प्रसाद आणि राजेंद्र प्रसाद यांनी मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले. तेथे दोघांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने यातील राजकुमार प्रसाद याचा जामीन अर्ज मंजूर केला तर, राजेंद्र प्रसाद याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. 

हेही वाचा