पणजी महानगरपालिका निवडणुकीच्या मतपत्रिका १३ मे पर्यंत सांभाळून ठेवा!

उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाचे निर्देश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th April, 11:49 pm
पणजी महानगरपालिका निवडणुकीच्या मतपत्रिका १३ मे पर्यंत सांभाळून ठेवा!

पणजी : मतदारांच्या गोपनीयतेचे उल्लंघन झाल्याचा दावा करत पणजी महानगरपालिका (सीसीपी) निवडणुकीला मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. निवडणुकीची मतपत्रिका (बॅलेट पेपर) तसेच इतर दस्तावेज १३ मे पर्यंत सांभाळून ठेवा, असा निर्देश न्यायालयाने दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ मे रोजी होणार आहे.

या प्रकरणी विष्णू नाईक यांच्यासह डिओदिता परेरा, वैभव साळगावकर आणि प्रशिला कुंकळ्ळीकर यांनी​ याचिका दाखल केली. त्यात सीसीपी आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) आणि नवनिर्वाचित ३० नगरसेवकांना प्रतिवादी केले आहे.

याचिकेत निवडणूक प्रक्रियेतील गंभीर त्रुटींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली असता, मतदान बॅलेट पेपरच्या पावतीवर क्रमांकासह मतदाराचे नाव व इतर माहिती लिहिण्यास अनिवार्य करण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या गोपनीयतेचे उल्लंघन झाल्याचा दावा याचिकादारांतर्फे अॅड. चैतन्य पाडगावकर यांनी न्यायालयात केला.

दरम्यान, नवनिर्वाचित ३० नगरसेवकांतर्फे ज्येष्ठ वकील नितीन सरदेसाई यांनी बाजू मांडली. त्यात त्यांनी निवडणूक झाल्यानंतर ६० दिवस मतपत्रिकांसह सर्व संबंधित कागदपत्रे जतन करून ठेवणे आवश्यक असल्याची माहिती न्यायालयात दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने वरील निर्देश जारी केले आहे. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ मे रोजी ठेवली आहे. 

हेही वाचा