सांकवाळमध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी; वेर्णा पोलिसांची छापेमारी, चौघांना अटक

१० मोबाइल फोन्स, दोन लॅपटॉपसह तब्बल २.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
48 mins ago
सांकवाळमध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी; वेर्णा पोलिसांची छापेमारी, चौघांना अटक

पणजी : इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील सामन्यांवर बेकायदेशीरपणे सट्टा लावणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा वेर्णा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सांकवाळ येथील एका भाड्याच्या खोलीत सुरू असलेल्या या सट्टेबाजीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील चार संशयितांना रंगेहाथ पकडले व चौकशीअंती त्यांना अटक केली. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेल्या अटीतटीच्या सामन्यावर हे संशयित सट्टा स्वीकारत असताना ही कारवाई करण्यात आली. 

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, वेर्णा पोलिसांनी ११ एप्रिल रोजी रात्री १०:४० ते १२ एप्रिलच्या पहाटे ३:३० वाजेपर्यंत सांकवाळ येथील शिंदोलीम भागातील एका घराच्या पहिल्या मजल्यावर ही मोहीम राबवली. अटकेत असलेल्या संशयितांची ओळख प्रांजल तिवारी (२३, उत्तर प्रदेश), अमर दावडा (३३, छत्तीसगड), शशांक कुमार साहू (१९, उत्तर प्रदेश) आणि संदीप सिंग (२३, उत्तर प्रदेश) अशी पटली आहे. हे सर्वजण गेल्या काही दिवसांपासून सांकवाळ परिसरात भाड्याने राहत होते आणि तिथूनच आपले सट्टेबाजीचे व्यवहार चालवत होते.

या छाप्यात पोलिसांनी सट्टेबाजीसाठी वापरले जाणारे १० मोबाईल फोन, दोन लॅपटॉप, एक टॅबलेट, इंटरनेट राउटर आणि ३७ हजार रुपयांची रोकड असा एकूण २.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वेर्णा पोलीस ठाण्यात गोवा सार्वजनिक जुगार कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीएल हंगामात गोव्यातील विविध भागांमध्ये अशा प्रकारे परप्रांतीय टोळ्या सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. ही कारवाई वेर्णा पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रिस्ली कार्व्हालो आणि त्यांच्या पथकाने केली.


हेही वाचा