गुजरातमध्ये अजब राजकीय खेळी: एकाच उमेदवाराचे भाजप, काँग्रेस आणि 'आप'कडून अर्ज

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
6 mins ago
गुजरातमध्ये अजब राजकीय खेळी: एकाच उमेदवाराचे भाजप, काँग्रेस आणि 'आप'कडून अर्ज

गुजरातच्या राजकारणात सध्या एका आगळ्यावेगळ्या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकाच उमेदवाराने चक्क भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अशा तिन्ही प्रतिस्पर्धी पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मतदार आणि राजकीय विश्लेषक चक्रावून गेले आहेत.

दाहोद जिल्हा पंचायतीच्या पिपरो मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. भारतसिंह वाखला असे या उमेदवाराचे नाव असून, त्यांनी एकाच जागेसाठी तिन्ही प्रमुख पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरले आहेत. पिपरो हा ज्येष्ठ नेते बच्चूभाई खाबड यांचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र वाखला यांच्या या विचित्र खेळीमुळे येथे मोठा 'राजकीय सस्पेन्स' निर्माण झाला आहे. 

पिपरो येथील जागेसाठी एकूण ११ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या अर्जांच्या पक्षनिहाय वितरणावर नजर टाकली असता, भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ५ अर्ज दाखल केले आहेत, ज्यामध्ये वाखला यांचाही समावेश आहे. त्याखालोखाल काँग्रेस पक्षाकडून २ उमेदवारी अर्ज आले असून, येथेही वाखला यांनी आपला दावा सादर केला असल्याचे दिसून येते. आम आदमी पार्टीने आपला केवळ एकच अर्ज दाखल केला असून तो वाखला यांच्या नावावर आहे. या प्रमुख पक्षांव्यतिरिक्त इतर उमेदवारांमध्ये २ अपक्ष आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचा (बीआरपी) एका अर्जाचा समावेश आहे. एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या पक्षांतून किंवा विविध गटांतून अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीतील तांत्रिक पेच आणि राजकीय डावपेच अधिक वाढले असून, या ११ अर्जांमधून आता प्रत्यक्ष रिंगणात कोण टिकते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. एकाच व्यक्तीने तीन वेगवेगळ्या पक्षांतून अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील तांत्रिक पेच वाढला असून, प्रशासनासमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे.

भारतसिंह वाखला यांचा राजकीय प्रवास नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यांनी यापूर्वी 'आप'कडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी वेळोवेळी काँग्रेस आणि 'आप'मध्ये ये-जा केली असून, काही काळापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचेही बोलले जात होते. मात्र, आता एकाच वेळी तिन्ही पक्षांकडून अर्ज भरल्याने प्रशासनासमोर मोठा प्रश्न उपस्थित राहील आहे. 

निवडणूक नियमांनुसार, उमेदवाराला संबंधित पक्षाचे अधिकृत 'ए' आणि 'बी' फॉर्म वेळेत सादर करावे लागतात. वाखला नक्की कोणत्या पक्षाचे अधिकृत पत्र सादर करतात, यावर त्यांची उमेदवारी निश्चित होईल. १५ तारीख ही अर्ज मागे घेण्याची आणि पक्षाचे अधिकृत पत्र सादर करण्याची शेवटची मुदत आहे. त्यानंतरच वाखला नक्की कोणत्या पक्षाचे 'कमळ', 'हात' की 'झाडू' हाती घेणार, हे स्पष्ट होईल. एकाच व्यक्तीने तीन परस्परविरोधी पक्षांचे प्रतिनिधित्व करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा