विश्वचषकाच्या तयारीतील त्यांच्या मदतीबद्दल मानले आभार

मुंबई : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने वानखेडे स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफला दिलेले आपले वचन पूर्ण करत माणुसकीचे दर्शन घडवले आहे. विश्वचषकाच्या तयारीदरम्यान केलेल्या अथक परिश्रमाचे फळ म्हणून हार्दिकने स्टेडियमच्या १० ते ११ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १०-१० लाख रुपयांचे धनादेश (Checks) वाटले असून, त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी हार्दिकने वानखेडे स्टेडियमवर कसून सराव केला होता. या सरावादरम्यान मैदानाची निगा राखणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेकदा रात्री उशिरापर्यंत थांबावे लागत असे. कर्मचाऱ्यांचे हे समर्पण पाहून हार्दिकने त्यांना वचन दिले होते की, जेव्हा तो विश्वचषक जिंकून पुन्हा मुंबईत परतेल, तेव्हा त्यांच्या मदतीबद्दल नक्कीच मोठे बक्षीस देईल. दिलेले हेच वचन त्याने आता आयपीएलच्या तोंडावर पूर्ण केले आहे.
या घटनेचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हार्दिक ग्राउंड स्टाफच्या मध्ये उभा असून कर्मचारी आनंदाने आपले धनादेश दाखवताना दिसत आहेत. २०२६ च्या विश्वचषकात टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देण्यात हार्दिकने अष्टपैलू कामगिरी बजावली होती. त्याने ९ सामन्यांत २१७ धावा कुटल्या होत्या आणि गोलंदाजीतही ९ महत्त्वपूर्ण बळी घेतले होते.
हार्दिक पांड्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केल्यास, त्याने आतापर्यंत ११ कसोटी, ९४ एकदिवसीय आणि १३८ टी-२० सामने खेळले आहेत. सध्या तो भारतासाठी केवळ पांढऱ्या चेंडूच्या (मर्यादित ओव्हर्स) क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत असून कसोटी क्रिकेटपासून काहीसा दूर आहे. मात्र, मैदानावरील कामगिरीसोबतच मैदानाबाहेरील त्याच्या या औदार्यामुळे चाहत्यांच्या नजरेत त्याची प्रतिमा अधिकच उंचावली आहे.