भारतीय तिरंदाजांची २ कांस्य पदकांसह धडाकेबाज सुरुवात

आशिया चषक तिरंदाजी : पुरुष रिकर्व्ह, महिला कंपाउंड संघ अंतिम फेरीत

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
1 hours ago
भारतीय तिरंदाजांची २ कांस्य पदकांसह धडाकेबाज सुरुवात

बँकॉक : आशिया चषक विश्व मानांकन तिरंदाजी स्पर्धेच्या (पहिल्या टप्प्यात) दुसऱ्या दिवशी भारतीय तिरंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे. याचसोबत पुरुष रिकर्व्ह आणि महिला कंपाउंड संघानी अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे भारताची आणखी दोन पदके निश्चित झाली आहेत.
गेल्या वेळी कांस्य पदक जिंकणाऱ्या महिला कंपाउंड संघाने यंदा आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे. चिकिथा तानीपर्थी, राज कौर आणि तेजल साळवे यांच्या त्रिकुटाने स्थानिक थायलंडच्या संघाचा २२९-२२६ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता सुवर्णपदकासाठी त्यांचा सामना कझाकस्तानशी होईल.
पुरुष कंपाउंड गटात पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळवूनही भारतीय संघाला आपले जेतेपद टिकवता आले नाही. उपांत्य फेरीत रजत चौहान, ऋषभ यादव आणि उदय कंबोज या जोडीला व्हिएतनामविरुद्ध २३३-२३४ अशा निसटत्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. मात्र, कांस्य पदकाच्या लढतीत भारताने भूतानवर २३४-२३२ अशी मात करत पदक पटकावले.
पुरुष रिकर्व्हमध्ये देवांग गुप्ता, सुखचैन सिंग आणि जुयेल सरकार या भारतीय संघाने मलेशियाचा ५-१ असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम लढतीत त्यांचा सामना कझाकस्तानशी होईल.
महिला रिकर्व्हमध्ये रुमा विश्वास, कीर्ती आणि रिद्धी फोर यांच्या त्रिकुटाने मलेशियाचा ५-१ असा पराभव करून भारताला स्पर्धेतील दुसरे कांस्य पदक मिळवून दिले. भारतीय तिरंदाजांच्या या कामगिरीमुळे स्पर्धेच्या आगामी फेरीत सुवर्णपदकाच्या आशा उंचावल्या आहेत.