राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार : आयुष म्हात्रे, मिताली राज यांचाही गौरव

नवी दिल्ली : भारताचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याला ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना बीसीसीआयकडून दिला जाणारा कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार हा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चा वार्षिक पुरस्कार सोहळा १५ मार्च रोजी दिल्लीत आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात अनेक खेळाडूंना त्यांच्या कामगिरीबद्दल गौरवण्यात येईल.
भारतीय अंडर-१९ संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल लाला अमरनाथ पुरस्कार देण्यात येणार आहे. म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने यावर्षीच्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. या व्यतिरिक्त भारतीय महिला क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज मिताली राज यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला ‘सर्वोत्कृष्ट क्रिकेट असोसिएशन’ पुरस्कार देण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र या सर्व पुरस्कारांबाबत बीसीसीआयकडून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
२०२५ मध्ये गिलची दमदार कामगिरी
२०२५ वर्षात शुभमन गिल याने तिन्ही फॉरमॅटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये स्थान मिळवले. त्याची कामगिरी पुढीलप्रमाणे होती:
कसोटी क्रिकेटमध्ये ९८३ धावा, इंग्लंडविरुद्ध मालिकेत ७० पेक्षा जास्त सरासरीने ७५४ धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९० धावा केल्या आहेत. एकूण धावा (सर्व फॉरमॅट) १७६४ केल्या असून त्याची सरासरी ४९ आहे. यामध्ये त्याने ७ शतके, ३ अर्धशतके यांचा समावेश आहे. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यातही मोठी मदत झाली.
द्रविडच्या कारकिर्दीचा गौरव
भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असलेले राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कसोटीत १३,२८८ धावा, वनडेमध्ये १०,८८९ धावा, एकूण १६४ कसोटी आणि ३४४ वनडे सामने खेळले आहेत. द्रविड यांची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. त्यांनी २०१२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
प्रशिक्षक म्हणून द्रविडचे मोठे यश
निवृत्तीनंतर द्रविड यांनी प्रशिक्षक म्हणूनही भारतीय क्रिकेटला मोठे योगदान दिले. त्यांनी १९ वर्षांखालील भारतीय संघ आणि इंडिया ए संघाला मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०१८ मध्ये अंडर-१९ विश्वचषक जिंकला. त्या संघात शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ यांसारखे खेळाडू होते. नंतर भारतीय वरिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी संघाला यश मिळवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले आणि आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.
भारतीय क्रिकेटसाठी गौरवाचा क्षण
बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार सोहळा भारतीय क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी आयोजित केला जातो. यंदाच्या सोहळ्यात शुभमन गिल, राहुल द्रविड, आयुष म्हात्रे आणि मिताली राज यांसारख्या क्रिकेटपटूंचा सन्मान होणार असल्याने हा सोहळा विशेष ठरणार आहे. भारतीय क्रिकेटच्या विविध स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या मंचावर गौरवण्यात येणार असल्याने हा सोहळा क्रिकेटप्रेमींसाठीही महत्त्वाचा मानला जात आहे.
स्नेहल कवठणकरला माधवराव सिंधिया पुरस्कार
पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) गोव्याचा क्रिकेटपटू स्नेहल कवठणकर याचे बीसीसीआय वार्षिक पुरस्कार – ‘नमन २०२४–२५’ सोहळ्यात प्रतिष्ठित माधवराव सिंधिया पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
रणजी ट्रॉफी २०२४–२५ (प्लेट गट) स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून कवठणकर याला हा सन्मान मिळाला असून ही कामगिरी गोवा क्रिकेटसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या प्रतिभावान फलंदाजाचे अभिनंदन करताना जीसीएचे अध्यक्ष महेश देसाई यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले. स्नेहलची ही कामगिरी गोवा क्रिकेटसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. रणजी ट्रॉफीमधील त्याची सातत्यपूर्ण कामगिरी त्याच्या कठोर परिश्रम, शिस्त आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनतर्फे मी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील काळातही त्याने अनेक यशाची शिखरे गाठावीत अशी शुभेच्छा देतो, असे देसाई म्हणाले.
जीसीएचे सचिव तुळशीदास शेट्ये तसेच गोवा क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनीही कवठणकर याचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी पुढील यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.