भुवनेश्वर-हेझलवूडच्या वादळात दिल्लीचा पालापाचोळा

७५ धावांत खुर्दा : आरसीबीचा ९ गड्यांनी विजय

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
27th April, 11:18 pm
भुवनेश्वर-हेझलवूडच्या वादळात दिल्लीचा पालापाचोळा

नवी दिल्ली : गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या वेगवान गोलंदाजांनी फिरोजशाह कोटला मैदानावर अक्षरशः कहर केला. भुवनेश्वर कुमार (५ धावांत ३ बळी) आणि जोश हेझलवूड (१२ धावांत ४ बळी) यांच्या अचूक स्विंग आणि वेगवान माऱ्यासमोर दिल्ली कॅपिटल्सचा डाव पत्त्यासारखा कोसळला. अवघ्या ७५ धावांत दिल्लीचा खुर्दा केल्यानंतर आरसीबीने हे लक्ष्य केवळ ६.३ षटकांत १ गड्याच्या मोबदल्यात पार करत मोठा विजय नोंदवला.
केवळ ४८ तासांपूर्वी २६५ धावांचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या दिल्लीला आज स्वतःच्याच घरी अपमानजनक पराभवाचा सामना करावा लागला. डावाच्या सुरुवातीलाच भुवनेश्वर कुमारने आपल्या स्विंगने दिल्लीच्या फलंदाजांना नाचवले. त्याने पदार्पण करणाऱ्या साहिल पारखला एका अप्रतिम इनस्विंगरवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर हेझलवूडने लोकेश राहुलला बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. २३ चेंडूंच्या आत दिल्लीची अवस्था ८ बाद ६ अशी झाली होती, जे आयपीएल इतिहासातील पॉवरप्लेमधील सर्वात निचांकी प्रदर्शन ठरले.
भुवनेश्वरने ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल यांना एकाच षटकात माघारी धाडले, तर हेझलवूडने नितीश राणाला बाद करून दिल्लीची मधली फळी कापून काढली. आरसीबीचा ४९ धावांचा निचांकी धावसंख्येचा विक्रम मोडला जातो की काय असे वाटत असताना अभिषेक पोरेलने (३०) थोडा प्रतिकार केल्याने दिल्लीने ७५ धावांपर्यंत मजल मारली.
७६ धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या फलंदाजांनी कोणतीही कसर सोडली नाही. जेकब बेथेलने १०४ मीटर लांब षटकार खेचत आक्रमक सुरुवात केली. त्यानंतर फॉर्मात असलेल्या देवदत्त पडिक्कलने काईल जेमीसनच्या एका षटकात २१ धावा लुटत विजयाचे अंतर झपाट्याने कमी केले. पडिक्कलने १३ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या, तर विराट कोहलीने षटकारासह विजयी धाव पूर्ण करत आरसीबीला ८१ चेंडू राखून विजय मिळवून दिला. या विजयामुळे आरसीबीचे ८ सामन्यांत १२ गुण झाले असून, प्ले-ऑफच्या दिशेने त्यांचे पाऊल अधिक मजबूत झाले आहे.
संक्षिप्त धावफलक:
दिल्ली कॅपिटल्स: ७५/१० (१६.३ षटके), अभिषेक पोरेल: ३० (३३), डेव्हिड मिलर: १९ (१७), जोश हेझलवूड: ४-१२ (४ षटके), भुवनेश्वर कुमार: ३-५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: ७७/१ (६.३ षटके), देवदत्त पडिक्कल: ३४ (१३), विराट कोहली: २३ (१५), कुलदीप यादव: १-१२ (१ षटक).