आरसीबीचा ५ गडी राखून विजय : रसिकची भेदक गोलंदाजी, विराटची ४९ धावांची खेळी

बंगळुरू : एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएल २०२६ च्या २३ व्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) लखनौ सुपर जायंट्सचा ५ गडी राखून पराभव केला. गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यामुळे लखनौचा डाव १४६ धावांत रोखल्यानंतर, आरसीबीने हे लक्ष्य १६ व्या षटकातच पार करत दिमाखदार विजय नोंदवला.
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय सार्थ ठरला. लखनौकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ४० धावा केल्या, तर मुकुल चौधरी (३९) आणि आयुष बदोनी (३८) यांनी झुंजार खेळ केला. मात्र, आरसीबीच्या गोलंदाजांनी त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.
१४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात आश्वासक झाली. 'किंग' विराट कोहलीने पुन्हा एकदा आपली चमक दाखवत सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले असले तरी, त्याने विजयाचा पाया रचला होता. कर्णधार रजत पाटीदारने २७ आणि जितेश शर्माने २३ धावांचे योगदान दिले. शेवटी टिम डेविड (१४*) आणि रोमारियो शेफर्ड (१४*) यांनी नाबाद राहत १६ व्या षटकातच आरसीबीला विजय मिळवून दिला.
लखनौकडून गोलंदाजीत युवा प्रिंस यादवने प्रभावी मारा केला. त्याने ३ फलंदाजांना बाद करून आरसीबीला धक्के देण्याचा प्रयत्न केला, मात्र कमी धावसंख्येमुळे तो लखनौचा पराभव टाळू शकला नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सचा संघ प्रथम फलंदाजी करताना १४६ धावांवर सर्वबाद झाला. बंगळुरूकडून रसिक दर सलामने ४ आणि भुवनेश्वर कुमारने ३ बळी घेतले. लखनौकडून मिचेल मार्शने ४०, मुकुल चौधरीने ३९ आणि आयुष बदोनीने ३८ धावा केल्या. लखनौने बंगळुरूसमोर केवळ १४७ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
कर्णधार रिषभ पंत दुखापतग्रस्त
तत्पूर्वी, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मिचेल मार्श व एडन मार्करम (१२) यांना पुन्हा एकदा मोठी भागीदारी करता आली नाही. जोश हेझलवूडचे पुनरागमन आरसीबीला फायद्याचे ठरले. त्याच्या गोलंदाजीवर लखनौचा कर्णधार रिषभ पंत दुखापतग्रस्त होऊन माघारी परतला. त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. हेझलवूडने सातव्या षटकात निकोलस पूरनचा (१) त्रिफळा उडवून लखनौला ३५ धावांवर दुसरा झटका दिला.
मार्श मैदानावर उभा होता, परंतु ९व्या षटकात सुयश शर्माने पायचितसाठी डीआरएस घेतला. पंचांच्या कॉलमुळे मार्शला जीवदान मिळाले. पण, कृणाल पांड्याने पुढच्या षटकात चेंडूला योग्य वळण देत मार्शला बाद केले. ३२ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४० धावा करणारा मार्श कट शॉट मारण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत झाला. लखनौला १० षटकांत ३ बाद ७१ धावाच करता आल्या.
कृणाल पांड्याचे विकेट्सचे ‘शतक’
कृणालच्या गोलंदाजीने आज कमाल केली आणि अब्दुल समदला (०) चकवा देत झेल देण्यास भाग पाडले. यासह कृणालने आयपीएलमध्ये विकेट्सचे शतक पूर्ण केले. आयुष बदोनी आणि मुकुल चौधरी या युवा खेळाडूंवर एलएसजीची भीस्त होती. मुकुलने केकेआर विरुद्ध केलेला करिष्मा माहीत असल्यामुळे कृणालने उगाच त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. पण, याकडे दुर्लक्ष करून मुकुलने आयुषसह चांगला खेळ केला. धावसंख्या ११८ असताना, लखनौ सुपर जायंट्सने १६ व्या षटकात आपली पाचवी विकेट गमावली.
रसिक दर सलामने आयुष बदोनीला २४ चेंडूंत ३८ धावांवर बाद केले. कर्णधार ऋषभ पंत फलंदाजीसाठी परतला. रिषभ कोपरावर पट्टी बांधून पुन्हा फलंदाजीसाठी तयार होता. आयुष बदोनीची विकेट पडल्यानंतर तो पुन्हा फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र ६ चेंडूत १ धाव करून तो बाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याची विकेट घेतली आहे. धावसंख्या १२४ असताना लखनौने १७ व्या षटकात आपली सहावी विकेट गमावली.
१८ षटकांच्या अखेरीस, लखनौ सुपरजायंट्सची धावसंख्या ६ गडी बाद १३५ होती. मुकुल चौधरीने २४ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा केल्या. जॉर्ज लिंडेने पाच चेंडूंत एका चौकारासह सहा धावा केल्या.
भुवनेश्वरचा तडाखा
भुवनेश्वर कुमारने १९ व्या षटकात चार धावा देत दोन बळी घेतले. मात्र, त्याची हॅटट्रिक हुकली. १९ षटकांनंतर लखनौ सुपर जायंट्सची धावसंख्या ८ गडी बाद १३९ होती. भुवनेश्वर कुमारने १९ व्या षटकात सलग दोन बळी घेतले. प्रथम त्याने जॉर्ज लिंडाला बाद केले आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीला त्रिफळाचीत केले. लखनौला सामन्यासाठी आवश्यक धावसंख्येपर्यंत पोहोचवल्यानंतर मुकुल चौधरीचा प्रभावी खेळी संपुष्टात आली. त्याने रसिक सलामच्या शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला, पण दुसऱ्याच चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला.
