पर्यटन खात्याकडून आउटडोअर मोहिमेसाठी निविदा जारी

पणजी : गोवा पर्यटन खात्याने राज्याच्या पर्यटनाचा प्रचार आणि प्रसिद्धी परराज्यांत मोठ्या प्रमाणावर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी देशातील ७ राज्यांमधील ११ प्रमुख शहरांत मोठ्या आकाराचे होर्डिंग्ज लावून गोवा पर्यटनाची प्रसिद्धी केली जाणार आहे. पर्यटन खात्याने या मोहिमेसाठी नुकतीच निविदा जारी केली आहे.
निविदेतील माहितीनुसार, गोवा पर्यटन खाते आपली प्रतिमा अधिक उजळ करण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी आक्रमकपणे प्रचार मोहीम राबवू इच्छिते. गोव्याची ओळख ‘३६५ दिवस पर्यटनाचे स्थळ’ म्हणून करून देण्याचा सरकारचा मुख्य हेतू आहे. यामध्ये प्रामुख्याने डेस्टिनेशन वेडिंग, आरोग्य, अध्यात्म, वारसा, माईस, साहसी खेळ, वास्तुकला आणि समुद्रकिनारे यांचा समावेश असेल.
निविदेनुसार, ११ शहरांमध्ये प्रत्येकी ६ याप्रमाणे एकूण ६६ होर्डिंग्ज लावले जातील. सुरुवातीला ही मोहीम ४५ दिवसांसाठी असेल, परंतु अटींनुसार या कालावधीत वाढ केली जाऊ शकते. या होर्डिंग्जचा आकार ३ हजार ते ७ हजार चौरस फूट इतका मोठा असणार आहे.
यामध्ये उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि प्रयागराज, महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक, गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा आणि सुरत तसेच पाटणा (बिहार), त्रिवेंद्रम (केरळ), कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि हैदराबाद (तेलंगणा) या शहरांचा समावेश आहे.
जाहिरातीचे ‘क्रिएटीव्ह डिझाइन’ गोवा पर्यटन विभाग किंवा त्यांच्या पी.आर. एजन्सीमार्फत दिले जाईल. संबंधित एजन्सीला होर्डिंग लावल्याच्या पुराव्यासाठी मोहीम सुरू होतानाचे आणि संपतानाचे जिओटॅग्ड फोटो सादर करावे लागतील. तसेच, फोटो काढताना त्या दिवसाचे वर्तमानपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे. होर्डिंगच्या जागेची तपासणी करण्यासाठी पर्यटन खात्याच्या प्रतिनिधीला नेणे आणि त्यांचा प्रवासाचा व राहण्याचा खर्च एजन्सीलाच करावा लागणार आहे.