चकमकीनंतर बांगलादेशी टोळीच्या सहा सदस्यांना बेड्या. गोवा आणि दिल्ली पोलिसांची संयुक्त कारवाई

पणजी/नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून गोवा, कर्नाटक आणि दिल्लीसह अनेक राज्यांत चोऱ्या करून फरार झालेल्या बांगलादेशी दरोडेखोरांच्या टोळीचा दिल्ली पोलिसांनी थरारक चकमकीनंतर नायनाट केला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सहा अट्टल दरोडेखोरांना अटक केली असून, हे सर्वजण म्हापसा आणि दोनापावला येथे झालेल्या मोठ्या दरोड्यांच्या प्रकरणांत 'मोस्ट वॉन्टेड' होते. या कारवाईमुळे आंतरराज्यीय स्तरावर सक्रिय असलेल्या एका क्रूर टोळीचा पर्दाफाश झाला असून, गोव्याच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कामगिरी यशस्वी झाली.
मध्यरात्रीचे थरारनाट्य आणि गोळीबार
दिल्लीतील सराय काले खान स्मशानभूमीजवळील जंगलात ही टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. १४ आणि १५ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्री पोलिसांनी या परिसराला वेढा घातला. आपण वेढले गेल्याचे लक्षात या सशस्त्र दरोडेखोरांनी आत्मसमर्पण करण्याऐवजी पोलिसांवर थेट गोळीबार सुरू केला. जिवाची पर्वा न करता पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळ्या झाडल्या आणि पाठलाग करून सहा जणांना जिवंत पकडले. अंधाराचा फायदा घेऊन दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
![]()
बांगलादेश ते भारत: 'हिट-रन-हाईड' स्ट्रॅटेजी
अटक करण्यात आलेले सर्व आरोपी बांगलादेशातील बागेरहाट जिल्ह्याचे रहिवासी आहेत. या टोळीची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध आणि क्रूर होती. हे दरोडेखोर बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून भारतात प्रवेश करत असत. एखाद्या राज्यात 'हिट' (दरोडा) मारल्यानंतर ते लगेच तिथून पळ काढत आणि थेट बांगलादेशात जाऊन लपून बसत (हाईड). काही महिने तिथे राहिल्यानंतर ते पुन्हा भारतात नव्या राज्याला लक्ष्य करण्यासाठी येत. विशेषतः एकांत ठिकाणी राहणारे श्रीमंत ज्येष्ठ नागरिक त्यांच्या निशाण्यावर असत. प्रतिकार केल्यास ही टोळी अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यासही मागे-पुढे पाहत नसे.

गोव्यातील दरोड्यांचे सत्य उघड
२० एप्रिल २०२५ रोजी दोनापावला येथील एका बंगल्यात घुसून या टोळीने घरमालकांना बाथरूममध्ये कोंडून एक किलो सोने आणि ३ लाख रुपये लुटले होते. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२५ रोजी म्हापशाच्या हाऊसिंग बोर्ड परिसरात अशाच पद्धतीने ३५ लाखांची लूट करून तक्रारदाराची कार घेऊन ते पसार झाले होते. गोव्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक (SP Crime) राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू होता. सायबर सेल आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गोव्याने दिलेले महत्त्वाचे धागेदोरे या आंतरराज्यीय टोळीपर्यंत पोहोचण्यासाठी निर्णायक ठरले.

जप्त शस्त्रे आणि गुन्हेगारी इतिहास
पोलिसांनी संशयितांकडून चार पिस्तूल, जिवंत काडतुसे, घरफोडीसाठी लागणारी प्रगत साधने आणि धारदार खंजर जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये सुमन हलदार, सैफुल इस्लाम, सोहेल शेख, मोहम्मद नासीर, नूर इस्लाम आणि झाकीर यांचा समावेश आहे. यातील मोहम्मद नासीरवर यापूर्वीच कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात खुनाचे गुन्हे दाखल आहेत. गोव्यातील दोन प्रकरणांसह कर्नाटक, दिल्ली, केरळ आणि ओडिशामधील एकूण १४ मोठे गुन्हे या टोळीने कबूल केले आहेत. गोव्याची गुन्हे शाखा आता ट्रान्सफर वॉरंटवर या आरोपींना ताब्यात घेऊन गोव्यात आणणार आहे.
