मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : साखळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा

साखळी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी न्याय व समतेच्या तत्त्वांवर आधारित महिला आरक्षण विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत मंजूर झाले असून, लवकरच ते कायद्यात रूपांतरित होणार आहे. यामध्ये मागासवर्गीय महिलांसाठीही विशेष तरतूद असणार असून, २०२९ नंतर त्या विधानसभा व लोकसभेत देशाचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. साखळी येथील रवींद्र भवनात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, मागासवर्गीय समाजाला सन्मान देण्याचे काम सध्याचे केंद्र सरकार करत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून या समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू असून, या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत.
या कार्यक्रमाला रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, साखळी भाजप मंडळ अध्यक्ष रामा नाईक, जिल्हा पंचायत सदस्य सुंदर नाईक, गुरुदास परवार, महादेव माणगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्या : मुख्यमंत्री
सोहळ्यानिमित्त मतदारसंघातील मागासवर्गीय बांधवांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित नागरिकांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी संवाद साधत विविध समस्या व मुद्दे मांडले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना समाधानकारक उत्तरे देत मार्गदर्शन केले. तसेच, मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊन उच्च शिक्षण घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. रस्ते व पायाभूत सुविधांसाठी जमीनमालकांची ना हरकत मिळाल्यास तत्काळ कामे हाती घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करताना उपस्थितांनीही मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.